दागिनावाला, देशपांडे, अग्रवाल, देशमुख, बोरकर यांना जीवनसाधना पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 10:34 AM2023-08-03T10:34:54+5:302023-08-03T10:38:04+5:30
नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव उद्या : उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रमुख अतिथी
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव समारंभ उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.४) आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कारांसाठी यंदा विविध क्षेत्रांतील पाच मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.
त्यात डॉ. एच. एफ. दागिनावाला (विज्ञान), डॉ. निरूपमा देशपांडे (सामाजिक) डॉ. शिवकिशन अग्रवाल (उद्योग), प्रा. सुरेश देशमुख (शिक्षण) आणि डॉ. हरिश्चंद्र बोरकर (कला) यांचा समावेश आहे. या सर्वांच्या नावांची घोषणा शताब्दी महोत्सव समारंभात केली जाईल. सप्टेंबरमध्ये पुरस्कार वितरण होईल. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
४ ऑगस्टला कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे दुपारी ३:३० वाजता आयोजित या शताब्दी महोत्सव समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस राहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील विशेष अतिथी राहतील. ४ ऑगस्ट १९२३ रोजी नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठाची सुरुवात झाली त्यावेळी ९१७ विद्यार्थी आणि ४ विद्या शाखा होत्या. १०० वर्षांत विद्यापीठाने सर्वच क्षेत्रांत ऐतिहासिक प्रगती केली.
दरम्यान, ४ मे २००५ पासून नागपूर विद्यापीठाचा ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला. सध्या विद्यापीठाचे ४८ पदव्युत्तर शिक्षण विभाग तर ५००च्या जवळपास संलग्नित महाविद्यालय असून, यामधून ४ लाखांवर विद्यार्थी उच्चशिक्षण घेत आहेत. शताब्दी महोत्सवाची ही सुरुवात असून, वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जातील. २०२४ मध्ये या महोत्सवाचा समारोप होईल. पत्रपरिषदेला कुलसचिव डॉ. राजू हिवसे, संजय कविश्वर, डॉ. संतोष कसबेकर, डॉ. अनंत पांडे उपस्थित होते.
मदने, कुमकुमवार आदर्श अधिकारी; बिनीवाले, गोतमारे यांच्याही कार्याचा गौरव
उपकुलसचिव डॉ. रमण मदने व सहायक कुलसचिव (प्रभारी) गणेश कुमकुमवार यांची आदर्श अधिकारी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे तर प्रदीप घ्यार, अरुण हट्टेवार, विलास घोडे, भास्कर शेंडे यांची ‘आदर्श कर्मचारी’ पुरस्कारासाठी, प्राचार्य बलराज अहेर स्मृती सुवर्णपदकासाठी उपकुलसचिव प्रदीप बिनीवाले यांची, शताब्दी महोत्सव सुवर्णपदकासाठी उपकुलसचिव वसीम अहमद, उद्यान अधीक्षक प्रवीण गोतमारे, राजेंद्र बालपांडे, दर्पण गजभिये यांची, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार - विशाल राजकुमार खर्चवाल (शिवाजी सायन्स कॉलेज, नागपूर) व अनुष्का नाग (हिस्लॉप कॉलेज, नागपूर.), उत्कृष्ट सांस्कृतिक उपक्रमपटू पुरस्कार- आशुतोष अजय तिवारी, आश्लेषा राजेश खंते, तसेच उत्कृष्ट राष्ट्रीय छात्रसेना कॅडेट पुरस्कार-साहिल भीमराव खेलकर (जी. एस. कॉमर्स कॉलेज, वर्धा), आरजू समीर खान पठाण (जी. एस. कॉमर्स कॉलेज, वर्धा) यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच नागपूर गुजराथी मंडळ या संस्थेची शिक्षण संस्था पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.