‘दाहोदा’ला सरपंचपदासाठी करावी लागेल प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:22+5:302021-02-05T04:37:22+5:30
रामटेक : तालुक्यात नुकतेच सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यात दाहोदा ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदासाठी आरक्षण अनु.जाती महिलासाठी निश्चित करण्यात आले. ...
रामटेक : तालुक्यात नुकतेच सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. यात दाहोदा ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदासाठी आरक्षण अनु.जाती महिलासाठी निश्चित करण्यात आले. पण या ग्रामपंचायत मध्ये झालेल्या निवडणुकीत अनु.जाती महिला संवर्गातील जागा कोणत्याही वॉर्डात राखीव नव्हती. यासोबतच निवडणुकीत अनु.जाती महिला संवर्गातील उमेदवार एकाही वॉर्डातून निवडून आलेला नाही. त्यामुळे दाहोदा गावाला काही काळासाठी सरपंचपदासाठी वाट पाहावी लागेल. याबाबत रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब मस्के म्हणाले, दाहोदा ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच निवडणूक होईल. सरपंचपदासाठी कार्यवाही करण्यात येईल. पण येथे कुणीही महिला अनु.जातीची नसल्याचे कुणीही उमेदवार रिंगणात राहणार नाही. उपसरपंच निवडणूक जाहीर करून येथे सरपंचपदाचा कारभार उपसरपंचाकडे सोपविण्यात येईल. प्रशासकपद संपुष्टात येईल. यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला जाईल. जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यावर पुन्हा सरपंचपदासाठी निवडणूक होईल. आरक्षण जाहीर झाल्यानंतर ८ ग्रामपंचायतच्या सरपंचपदासाठीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पंचाळा बु. येथे महिला अनु.जातीसाठी राखीव असल्याने येथे वर्षा राजेंद्र मडामे व सर्वसाधारण गटातून निवडून आलेल्या प्रगती पंकेश माटे यांच्यातून एकीची निवड होईल. दोन्ही काँग्रेस समर्थित आघाडीच्या उमेदवार आहेत. खुमारी येथे अनु.जाती संवर्गात संगीता कैलास पाटील या एकच उमेदवार आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जाते. शिवनी भों. येथे ना.मा.प्र.साठी राखीव आहे. येथे भोजराज नामदेव धुवाधपार हे दावेदार आहे. पण येथे एखादी महिला उमेदवारही दावेदारी ठोकू शकते. मानापूर येथे ना.मा.प्र.उमेदवार संदीप मधुकर सावरकर हे प्रबळ दावेदार उमेदवार आहे. तेच सरपंच होऊ शकतात. देवलापार ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस समर्थित आघाडीच्या प्रणाली जितेंद्र सरोदे व पठाण शाहिस्ता इलीयाज खान या दोघी प्रबळ दावेदार आहेत. पण प्रणाली सरोदे या पं.स.सभापती राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचेच पारडे जड आहे. चिचाळ्याचे सरपंचपद ना.मा.प्र. महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे येथे ज्योती रामकृष्ण परगवार व हेमा दिलीप नागपुरे या दावेदार आहेत. किरणापूर अनु. जमातीसाठी राखीव असल्याने येथे श्रीकृष्ण महादेव उईके यांची दावेदारी पक्की आहे. पथरई येथील सरपंचपद अनु.जातीसाठी असल्याने येथे संदीप मनीराम वासनिक हेच सरपंच बनतील. आरक्षणामुळे मात्र सदस्यांची पळवापळवी कमी झालेली दिसेल हे मात्र खरे.