भ्रष्टाचारी चाैबेला दोन दिवसांची सीबीआय कस्टडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:38+5:302021-07-14T04:10:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाहन उपलब्ध करून देणाऱ्या कंत्राटदाराला बिल काढून देण्याच्या बदल्यात १० हजारांची लाच मागणारा मध्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहन उपलब्ध करून देणाऱ्या कंत्राटदाराला बिल काढून देण्याच्या बदल्यात १० हजारांची लाच मागणारा मध्य रेल्वेचा वरिष्ठ मंडळ मेकॅनिकल इंजिनियर अखिलेश चाैबे याला न्यायालयाने दोन दिवसांची सीबीआय कस्टडी मंजूर केली. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी दुपारी अखिलेश चाैबेला लाच घेताना पकडले होते.
नागपुरातील ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकाने १६ नोव्हेंबर २०२० ते १५ मे२०२१ या कालावधीत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात अधिकाऱ्यांना वाहन उपलब्ध करून दिले होते. त्याचे १ लाख, ७३, ०८७ रुपयांचे बिल रेल्वे खात्यात थकीत होते. लाच मिळवण्यासाठी चाैबेने ते हेतूपुरस्सर अडवून ठेवले होते. गेल्या आठवड्यात संचालकाने चाैबेची भेट घेतली असता चाैबेने बिल काढण्यासाठी १० हजारांची लाच मागितली. लाच दिल्याशिवाय बिल काढून देणार नाही, असेही बजावले. त्यामुळे संबंधित संचालक गुरुवारी सीबीआयकडे पोहचले. त्यांनी दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून घेतल्यानंतर सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास सीबीआयचे पथक मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात धडकले. चाैबेने तक्रारदाराकडून लाचेचे दहा हजार रुपये स्वीकारताच सीबीआयच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. मंगळवारी त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करून त्याची दोन दिवसांची कस्टडी मिळवली.
----
दस्तावेज ताब्यात
चाैबेच्या नागपुरातील कार्यालय आणि निवासस्थानासोबतच सीबीआयच्या पथकाने त्याच्या मध्य प्रदेशातील निवासस्थानीही झडती घेतली. या ठिकाणांहून काही दस्तावेज ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
-----