दाजीबा गर्ल वैशाली सामंतने जिंकले
By admin | Published: October 19, 2015 02:40 AM2015-10-19T02:40:31+5:302015-10-19T02:40:31+5:30
हिंदी - मराठी गीतांच्या पार्श्वगायन क्षेत्रातील मराठमोळी जादुई स्वरांची गायिका म्हणजे वैशाली सामंत. भन्नाट मस्तीभऱ्या गीतांसह, ...
लोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचे आयोजन
नागपूर : हिंदी - मराठी गीतांच्या पार्श्वगायन क्षेत्रातील मराठमोळी जादुई स्वरांची गायिका म्हणजे वैशाली सामंत. भन्नाट मस्तीभऱ्या गीतांसह, गंभीर खोलवर जाणारी गीतेही सारख्याच ताकदीने सादर करणारी ही गायिका. तरुणाईची आवडती गायिका असणाऱ्या वैशाली सामंतच्या गीतांचा कार्यक्रम रविवारी लक्ष्मीनगर येथील व्हॉलिबॉल प्रांगणात आयोजित करण्यात आला. आपल्या लाडक्या गायिकेला समोर पाहून प्रेक्षकांनीही तिला दाद देत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
लोकमत आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मूळ नागपूरचे महागायक अनिरुद्ध जोशी आणि रसिका जोशी यांचाही सहभाग होता. वैशालीचे गुरु संगीततज्ज्ञ पं. मनोहर चिमोटे नागपुरातीलच असल्याने तिचे बंध या मातीशी जुळले आहे. स्वर पावसात भिजतात, ऐका दाजिबा हे तिचे संगीत अल्बम लोकप्रिय झाले आहेत. लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून तिने रसिकांना जिंकले ‘ऐका दाजिबा..’ हे गीत सादर करीतच तिने रंगमंचावर प्रवेश केला आणि त्यानंतर एकापेक्षा एक सरस गीते सादर करून तिने रसिकांची दाद घेतली.
याप्रसंगी तिने काही हिंदी आणि मराठी गीते सादर केली. ‘छलका छलका रे.., कलासिका पानी, ही गुलाबी हवा वेड लावी जीवा.., आभास हा छळतो मला.., गोंधळाला ये..’ आदी गीते सादर करताना तिने प्रथमपासूनच कार्यक्रमावर पकड ठेवली. तिच्यासह रसिका आणि अनिरुद्ध जोशी यांनीही गीतांच्या दमदार सादरीकरणाने रसिकांना थिरकायला भाग पाडले. निवेदन नम्रता अग्निहोत्री यांचे होते. वाद्यसंगीतात महेंद्र ढोले, परिमल जोशी, अरविंद उपाध्ये, तुषार विघ्ने, श्रीकांत खोलकुटे यांनी सुयोग्य साथसंगत केली. शेफ विष्णू मनोहर, पोलीस अधिकारी माने, मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न मोहिले याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)