अयोध्येचा देशभरात उत्साह; रामनामाच्या जयघोषाने दुमदुमले दक्षिण नागपूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 05:44 PM2024-01-22T17:44:54+5:302024-01-22T17:45:37+5:30
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा निमित्ताने अख्खे दक्षिण नागपूर राममय झाले होते.
नागपूर : भाविकांच्या चेहºयावर भगवान रामाच्या श्रद्धेची भावपूर्णता, चौकाचौकात भगवान रामाची साकारलेली झाकी... ध्वनिक्षेपकामधून रामनामाचा जप... रस्त्यावर लक्ष वेधून घेणारी रांगोळी...डीजेवर रामभक्तीच्या गाण्याची धूम...स्वागत कमानी...,फुलांचा परिमळ...प्रसादाचे वितरण आणि आंकठ बुडालेल्या भाविकांनी केलेला ह्यजय श्रीरामचाह्णचा गजरह्ण, उत्साहाने आणि आनंदाने भारलेल्या या मंगलमयी वातावरणात अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा निमित्ताने अख्खे दक्षिण नागपूर राममय झाले होते.
अयोध्या नगरातील राम मंदिरात भक्तांची गर्दी
अयोध्या नगरातील श्री रामचंद्र स्वामी देवस्थानात सोमवारी सकाळपासून भक्तांनी गर्दी केली होती. मंदिरात विशेष पूजा व आरतीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, मंदिराचा परिसरात अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. ते पाहण्यासाठी अयोध्या नगरवासी मोठ्या संख्येत उपस्थित होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. स्क्रीनच्या बाजूला राम, सीता व लक्ष्मणाचा वेशभूषेत असलेली चिमुकले लक्ष वेधून घेत होते. या भक्तीमय वातावरणात दुपारनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जय हिवरकर, महादेवराव डाखोरे, अशोक बदनवरे, विजय तांबोळी, आसाराम ढोबळे, पंढरी पिंपळे, राजा भांदककर, वसंत आजने, संजय नक्षणे, मोहन सोनवने, प्रशांत मामीडवार आदींनी परिश्रम घेतले.
तुकडोजी नगरातील हनुमान मंदिरात भजन
तुकडोजी महाराज चौक, तुकडोजी महाराज नगर येथील श्री शिवशक्ती हनुमान मंदिर सेवा समितीच्यावतीने महिलांनी विशेष भजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रामासारखा आदर्श शासक, उत्तम माणूस आजच्या समाजातही प्रगटावा अशी करुणा मनोमन भाकत होते.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये श्री रामाचे दर्शन
मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा परिसरही राममय झाला होता. डॉक्टर, परिचारिका व कर्मचाºयांनी परिसरात भगव्या पताका लावल्या होत्या. प्रवेशद्वार भगव्या फुग्यांनी सजवले होते. बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) श्री रामाचे कटआऊट लावून परिसर सुशोभीत करण्यात आला होता.
मेडिकलच्या कर्मचारी मित्र मंडळाकडून महाप्रसाद वितरण
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) कर्मचारी मित्र मंडळाकडून महाप्रसाद वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना परिचारिका आरती आत्राम यांची होती. या कार्यक्रमाला निर्मला रणदिवे, भावना बन, सुलभाताई, फटींगताइ, रेखा पुरी, गुणवंती ताकोद, योगेश वरखडे, जुल्फीकार अली, नरसिंग देवरवर, मृगेंद्र तेले, ईश्वर राठोड, श्याम शुक्ला, श्याम काळमेघ यांचे सहकार्य लाभले.