आश्वासनांपेक्षा स्वस्त दरात डाळ वाटा
By admin | Published: October 22, 2016 02:37 AM2016-10-22T02:37:44+5:302016-10-22T02:37:44+5:30
गेल्या दोन वर्षापासून डाळींच्या भावाने उच्चांक गाठला आहे. ऐन सणासुदीच्या काळात परत भाववाढ वाढ होत आहे.
डाळींवरून देशमुखांचा बापटांवर नेम : भाव नियंत्रित ठेवण्यात अपयशी
नागपूर : गेल्या दोन वर्षापासून डाळींच्या भावाने उच्चांक गाठला आहे. ऐन सणासुदीच्या काळात परत भाववाढ वाढ होत आहे. यामुळे या काळात सामान्य नागरिकांच्या ताटातून डाळ हद्दपार होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी मंत्री गिरीश बापट हे जबाबदार आहेत, अशी टीका माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांवर माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी नेम साधल्यामुळे ऐन दिवाळीत पुन्हा एकदा डाळीला तडका मिळण्याची शक्यता आहे.
देशमुख यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दिवाळीत ग्राहकांना माफक दरात डाळी उपलब्ध झाल्या नाही तर आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. आपण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री असतानाही डाळींच्या किमती वाढल्या होत्या. यावर तोडगा काढत केंद्र सरकारकडुन व इतर राज्यातुन जवळपास ५० हजार मेट्रिक टन डाळ आयात करुन ती राज्यभरातील रेशन दुकानाच्या माध्यमातुन उपलब्ध करून दिली होती.
सवलतीच्या दरात डाळ ही योजना यशस्वीपणे राबविली होती. शिवाय याच काळात गरिबांना दिवाळीत पाम तेल हे ४५ रुपये किलो प्रमाणे दिले होते, याची आठवण देशमुख यांनी बापट यांना करून दिली आहे. सणासुदीचा काळ असताना बापट यांनी फक्त ७०० मेट्रिक टन डाळीची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्यात डाळींची मागणी यापेक्षाही मोठी आहे. मात्र ही मागणी पूर्ण करण्यासाठी तसेच भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बापट हे कोणतेही ठोस प्रयत्न करताना दिसत नाही. आश्वासनाची खैरात वाटण्यापेक्षा रेशन दुकानातून स्वस्त दरात तूर डाळ वाटण्याचे काम त्यांनी करावे अशी खोचक टीकाही देशमुख यांनी केली आहे.
राज्यात जवळपास १ कोटी ७७ लाख हे एपीएल म्हणजेच केशरी कार्ड धारक आहेत. आपण या खात्याचा मंत्री असतांना या कार्डधारकांना १० किलो गहू व ५ किलो तांदूळ असे १५ किलो धान्य हे सवलतीच्या दरात देण्यात येत होते.
परंतु बापट मंत्री होताच केशरी कार्ड धारकांना मिळणारे सवलतीच्या दारातील हे धान्य देणे बंद करण्यात आले. यामुळे राज्यातील १ कोटी ७७ लाख कुटुंबाच्या तोंडचा घास हिरावला आहे. हेच सामान्य नागरिकांचे अच्छे दिन का, असा टोलाही देशमुख यांनी बापट यांना लगावला आहे.(प्रतिनिधी)