नागपुरात  वेश्याव्यवसायात गुंतलेला दलाल गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:59 AM2018-11-02T00:59:35+5:302018-11-02T01:01:13+5:30

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) वेश्याव्यवसायात गुंतलेल्या एका दलालाला अटक केली. राहुल ऊर्फ मोरश्वर दाजीबा निमजे (वय २६, गोळीबार चौक, तहसील) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

A Dalal engaged in prostitution arrested in Nagpur | नागपुरात  वेश्याव्यवसायात गुंतलेला दलाल गजाआड

नागपुरात  वेश्याव्यवसायात गुंतलेला दलाल गजाआड

googlenewsNext
ठळक मुद्देएसएसबीने केली अटक : दोन वारांगनाही सोडवल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) वेश्याव्यवसायात गुंतलेल्या एका दलालाला अटक केली. राहुल ऊर्फ मोरश्वर दाजीबा निमजे (वय २६, गोळीबार चौक, तहसील) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
राहुल प्रारंभी वाहनचालक म्हणून काम करीत होता. वेश्याव्यवसायात गुंतलेल्या महिला-तरुणींची इकडून तिकडे ने-आण करताना त्याला या धंद्याचे सूत्र गवसले. कमी वेळेत हजारो रुपये हातात पडत असल्याने तो या गोरखधंद्यात सहभागी झाला. त्याच्याकडे वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक महिला-मुली असल्याची माहिती कळताच एसएसबीच्या पथकाच्यावतीने बनावट ग्राहकाने निमजेसोबत संपर्क साधला. त्याने जागा उपलब्ध करून देण्यास नकार देऊन रस्त्यावर तरुणी आणून देतो, तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी घेऊन जा, असे म्हटले. ग्राहकाने त्याला होकार देताच तीन हजार रुपयात दोन तरुणी उपलब्ध करून देण्याचे ठरले. या तरुणींना घेऊन निमजे छोटा ताजबाग परिसरात पोहोचला. त्याने ग्राहकांकडून रक्कम घेऊन वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरुणींना ग्राहकाच्या हवाली करताच एसएसबीच्या पथकाने निमजेच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याविरुद्ध सक्करदरा पोलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने आणलेल्या वारांगना जबलपूर येथील असल्याचे समजते. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसबीच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

दुसऱ्यांदा सापडला निमजे
निमजे गेल्या दोन वर्षांपासून या गोरखधंद्यात सहभागी असून, त्याला यापूर्वीही नंदनवन परिसरात एका कुंटणखान्यावर पकडण्यात आले होते. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत शहर पोलीस दल कुंटणखाना चालविणाऱ्यांविरोधात चांगलेच सक्रिय झाले आहे. अर्थपूर्ण निष्क्रियतेचे वाभाडे निघाल्यानंतर एसएसबीही आता कामाला लागली आहे. त्यामुळे वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांनी आता वारांगनांना चक्क रस्त्यावरच ग्राहकांच्या हवाली करण्याची शक्कल लढवली आहे. गेल्या आठवड्यात फुटाळा चौपाटीवर अशाच प्रकारे एका वारांगनेला ग्राहकाच्या हवाली करताना पोलिसांनी पश्चिम बंगालमधील एका दलालाच्या मुसक्या बांधल्या होत्या.

Web Title: A Dalal engaged in prostitution arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.