देशातील दलित वर्गाचे लक्ष नागपूरकडे! नितीन राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 09:27 PM2020-02-22T21:27:56+5:302020-02-22T21:35:59+5:30
आज देशभरातील दलित वर्गाचे लक्ष नागपूरकडे लागले असून, त्यासाठी आंबेडकरी चळवळीचा आवाका सांस्कृतिक क्षेत्रातून वाढविण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मोठ्या प्रमाणात सामाजिक अभिसरण निर्माण करणाऱ्या चळवळींनी जोर धरला आहे. आज देशभरातील दलित वर्गाचे लक्ष नागपूरकडे लागले असून, त्यासाठी आंबेडकरी चळवळीचा आवाका सांस्कृतिक क्षेत्रातून वाढविण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
सम्यक थिएटरच्या वतीने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात द्विदिवसीय ‘आंबेडकर नाट्य महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगीत राऊत बोलत होते. व्यासपीठावर विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, दमक्षेचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनील रामटेके उपस्थित होते.
बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर उपेक्षित वर्गाने आपल्या वेदना मांडण्यासाठी पोवाडे व नाटकांचा आधार घेतला. नागपूर हे या चळवळीचे केंद्र बनले असून, संपूर्ण देशाचे लक्ष नागपूरकडे लागले आहे. त्यामुळे, चळवळीतील कलाकृतींचा आवाका वाढविण्यासाठी व येथील दलित कलाकृती दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान येथे सादर करण्याची संधी सरकारतर्फे दिली जाईल, अशी घोषणा राऊत यांनी केली. जम्मूमध्ये दलित समाज मोठा आहे परंतु, त्यांना बाबासाहेबांविषयी माहिती नाही. त्या भागात प्रशासकीय सेवेतील लोक बाबासाहेब समजावून सांगत आहेत. चळवळीला टिकवून ठेवणे कठीण असते. त्याचे प्रत्यंतर आंबेडकरी चळवळीतून मोठे झाल्यानंतर मांडण्यात आलेल्या वेगवेगळ्या चुलींवरून स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले. आंबेडकरी चळवळीला वेग देण्यासाठी पुढाकार घेऊ व जिल्हाधिकारी फंडातून या उपक्रमांसाठी वेगळा निधी उपलब्ध करवून देण्याची घोषणा त्यांनी केली. सोबतच या महोत्सवासाठी नऊ लाख रुपये मिळवून देण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवाय लहान संस्थांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी केले. तत्पूर्वी, डॉ. सुनील रामटेके यांचे बिजभाषण झाले. प्रास्ताविक नरेश साखरे यांनी केले. संचालन अशोक जांभूळकर यांनी केले तर आभार किरण काशिनाथ यांनी मानले. याप्रसंगी इ.मो. नारनवरे, डॉ. नीलकांत कुलसंगे, प्रभाकर दुपारे, दादाकांत धनविजय, अमर रामटेके, कमल वाघधरे, डॉ. सतीश पावडे, चंदा गोटे-कुलसंगे, तक्षशिला वाघधरे, वंदना जिवने, मीनाक्षी बोरकर या ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार करण्यात आला.