दलित साहित्य समस्त मानवी समाजासाठी प्रेरणादायी : उर्मिला पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 09:50 PM2019-03-09T21:50:20+5:302019-03-10T01:18:00+5:30

मानवाने चंद्रावर ठेवलेले पहिले पाऊल हे एका माणसाचे, देशाचे नव्हते तर ते संपूर्ण मानवी समाजाचे होते. तथागत बुद्धाचे तत्त्वज्ञान एका धर्माचे किंवा देशाचे नाही तर संपूर्ण मानवसमाजाच्या कल्याणासाठी आहेत. त्या तथागताची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन निर्माण झालेले दलित साहित्य हे जातीचे नाही तर मानवी समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे विचार दुसऱ्या अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा उर्मिला पवार यांनी व्यक्त केले.

Dalit literature is inspiring for all human societies: Urmila Pawar | दलित साहित्य समस्त मानवी समाजासाठी प्रेरणादायी : उर्मिला पवार

दलित साहित्य समस्त मानवी समाजासाठी प्रेरणादायी : उर्मिला पवार

Next
ठळक मुद्देअ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाचे उदघाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवाने चंद्रावर ठेवलेले पहिले पाऊल हे एका माणसाचे, देशाचे नव्हते तर ते संपूर्ण मानवी समाजाचे होते. तथागत बुद्धाचे तत्त्वज्ञान एका धर्माचे किंवा देशाचे नाही तर संपूर्ण मानवसमाजाच्या कल्याणासाठी आहेत. त्या तथागताची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन निर्माण झालेले दलित साहित्य हे जातीचे नाही तर मानवी समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे विचार दुसऱ्या अ.भा. आंबेडकरी महिलासाहित्य संमेलनाच्या अध्यक्षा उर्मिला पवार यांनी व्यक्त केले.
अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्यावतीने आयोजित आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवारी थाटात पार पडले. सार्क संघटनेच्या अधिकारी नूर जहीर यांच्याहस्ते हे उदघाटन पार पडले. याप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, कुसुमताई तामगाडगे, अमेरिकेच्या डॉ. वृंदा साखरकर, माजी संमेलन अध्यक्षा डॉ. कौशल पणवार, डॉ. विमल थोरात, कर्नाटकच्या बामा आदी मान्यवर उपस्थित होते. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शेड्यूल कास्ट महिला फेडरेशनच्या अध्यक्षा सुलोचनाताई डोंगरे यांचे संमेलन परिसराला तर सभागृहाला प्रा. नलिनी सोमकुंवर व व्यासपीठाला कवयित्री रजनी तिलक यांचे नाव देण्यात आले आहे. अध्यक्षीय मनोगत मांडताना उर्मिला पवार यांनी थेरी गाथेमधून बुद्ध तत्त्वज्ञान जगासमोर मांडणाऱ्या बुद्ध काळातील चंडालिका या लेखिकेपासून बहिष्कृत ठेवलेल्या दलित समाजातील स्त्री लेखिकांचा इतिहास श्रोत्यांसमोर ठेवला. संत चोखामेळा यांची पत्नी सोहीरा, बहिण निर्मळा व भागू महारीण यांच्यानंतर सावित्रीबाई फुले, त्यांच्यासोबतच्या पहिल्या मुस्लीम महिला शिक्षिका फातिमा यांच्यापासून २० व्या शतकातील राधाबाई कांबळे, जाईबाई चौधरी ते कुमुद पावडे आणि रूपाताई कुळकर्णी यांच्यापर्यंतच्या महिला साहित्यिकांचे कर्तृत्व त्यांनी वर्णन केले. देशातील इतर आंबेडकरी वैचारिकता घेतलेल्या महिला साहित्यिकांचाही उल्लेख त्यांनी केला. त्यांनी सरकारवरही टीका केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या व त्यांच्याप्रमाणे स्वतंत्र विचार मांडणाऱ्या लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. नयनतारा यांना बोलू दिले नाही. सतत भीती दाखविली जात आहे. यावर बोलणाऱ्या नसिरुद्दीन शाह, अमोल पालेकर यांच्यासारख्या अभिनेत्यांना लक्ष्य केले जाते. खैरलांजीनंतरही जवखेड्यापासून भीमा कोरेगावपर्यंत अत्याचाराच्या घटना थांबल्या नाही आणि दु:ख म्हणजे सरकार गुन्हेगारांनाच संरक्षण देत आहे. स्त्रियांवर अत्याचार वाढले व शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुपटीने वाढल्या आहेत.
सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली असून शहरात गुन्हेगारी वाढली आहे. सरकारी नोकऱ्या बंद करून आरक्षणाला कुचकामी केले जात आहे. लोकांना पशु बनविले जात असून त्यांचा मेंदू गोठविला जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. देशातील मंदिरात असलेला पैसा लोककल्याणात वापरण्याचे आवाहन करीत खासगी क्षेत्रामध्येही आरक्षण लागू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
डॉ. वृंदा साखरकर म्हणाल्या, अस्मिता हा कोणत्याही चळवळ किंवा संमेलनाचा केंद्रबिंदू असतो. आजही दलित महिलांना वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. मात्र त्या बौद्धिकतेने कमी नाहीत. साहित्यामधून दलित महिलांची अस्मिता मांडली जावी, असे आवाहन त्यांनी केले. महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे म्हणाले, समतेचा, मुक्तीचा मार्ग स्वीकारणारा, कोणताही माणूस आंबेडकरी चळवळीचा घटक आहे. आंबेडकरी स्त्री हे स्वत:च स्वयंपूर्ण स्त्रीचे रूप आहे. तिचा परीघ अधिक विस्तृत व्हावा. केवळ स्त्री म्हणून नाही तर जाती, धर्म, लिंग, वर्ण व वर्गाच्या पलिकडे जाउन माणूस म्हणून तिचे कर्तृत्व जगाने स्वीकारावे व यातून आंबेडकरी लेखिकांच्या, कवयित्रींच्या, नाट्यलेखिकांच्या चिंतनाला नवा उजाळा प्राप्त व्हावा, ही संमेलनामागची भूमिका त्यांनी मांडली. प्रास्ताविक संमेलनाच्या संयोजिका छाया खोब्रागडे यांनी केले. संचालन डॉ. जलदा ढोके यांनी तर सुगंधा खांडेकर यांनी आभार मानले. उदघाटन सत्राच्यावेळी सरिता सातरडे, प्रा. विमल गाडेकर, डॉ. पुष्पा आंबोरे व प्रशांत वंजारे यांच्या पुस्तकांचे विमोचनही करण्यात आले.

धर्मांधता नाकारली तरच प्रगती : नूर जहीर
 सार्क संघटनेत कार्यरत नूर जहीर यांनी मॉब लिंचिंग, दलित अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करीत संविधान धोक्यात असल्याची भीती व्यक्त केली. विचारांवर बंधन घालणे हा सर्वात मोठा दहशतवाद असून तीच अराजकता सध्या देशात सुरू असल्याची टीका त्यांनी केली. कम्युनिस्टांनीही जातीभेदावर आतापर्यंत मौन पाळल्याची टीकाही त्यांनी केली. दहशतवादावर कारवाई व्हावी, पण कलावंतांना रोखण्याऐवजी वैचारिक आदानप्रदान व्हावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. हिंदुत्वामध्ये मनुवादाने दलितांसोबत स्त्रियांना गुलाम करण्याचे षड्यंत्र आखले, तोच मनुवाद आता दलित आणि मुस्लिमांमध्येही हावी ठरत आहे. येथेही धर्माची भीती दाखवून महिलांना रुढीवादात बंदिस्त केले जाते. पण मंदिर आणि मस्जिदीतून महिलांची प्रगती होणार नाही, म्हणून त्यांच्यावर अवलंबून राहू नका, ते केवळ छळ करतील. धर्मांधतेचे जोखड झुगारून स्वत: स्वत:ची प्रगती करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन नूर जहीर यांनी केले. 

दलितांमधला मनुवादही धोकादायक : कौशल पनवार
 दिल्ली विद्यापीठाच्या संस्कृत प्राध्यापक व माजी संमेलन अध्यक्षा डॉ. कौशल पनवार यांनी व्यक्तीगत अनुभवातून देशातील दलित साहित्यिकांवर मनुवादाचा आरोप केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसोबत महिलांच्याही उद्धारासाठी सर्वस्व अर्पण केले. केवळ दलितच नाही तर तमाम जातीधर्मातील महिलांच्या सन्मानासाठी आग्रह धरला. म्हणून बाबासाहेबांच्या आंदोलनात महिलांचेही योगदान महत्त्वाचे राहिले आहे. आज मात्र त्यांची विचारधारा मानण्याचा दावा करणारे मोठे दलित स्कॉलर महिलांच्या वैचारिकतेवर प्रश्न उपस्थित करतात. महिलांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. महिलांच्या वेशभूषेवरूनच नाही तर भाषा आणि जातीवरूनही टार्गेट केले जाते. त्यांचे विश्लेषण केले जाते. सोशल मीडियावर आलेला अनुभव मांडत हे आंबेडकरी विचारधारेला घातक असल्याचे मनोगत त्यांनी मांडले. या भेदभावपूर्ण व्यवहारावर मौन बाळगणाऱ्या आंबेडकरी पुरुषांवरही त्यांनी प्रहार केला. आम्ही उच्च वर्णीयांविरोधात संघर्ष करताना आपल्यातच ऐक्य नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Dalit literature is inspiring for all human societies: Urmila Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.