दलित, मुस्लिम व्यक्तीला सरसंघचालक करावे
By admin | Published: April 3, 2016 03:52 AM2016-04-03T03:52:19+5:302016-04-03T03:52:19+5:30
शोषणमुक्त व समरसता असलेला भारत हवा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणतात.
बी.जी. कोळसे पाटील : ‘देशप्रेम व देशद्रोहाचे सिद्धांत’ यावर परिसंवाद
नागपूर : शोषणमुक्त व समरसता असलेला भारत हवा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणतात. जर त्यांना खरेच असे वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा व एखाद्या दलित किंवा मुस्लिम व्यक्तीला सरसंघचालकपदी बसवावे, असे मत ‘आरएसएसमुक्त भारत अभियान’चे प्रवर्तक माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. देश बचाओ आघाडीतर्फे ‘देशप्रेम आणि देशद्रोहाचे सिद्धांत’ या विषयावर परिसंवादाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
धनवटे नॅशनल कॉलेज येथील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित या परिसंवादाला दिल्ली विद्यापीठातील प्रा.अपूर्वानंद तसेच राजकीय चळवळीत सक्रिय असलेल्या कविता कृष्णन, देश बचाओ आघाडीचे संयोजक विरा साथीदार हे प्रामुख्याने उपस्थित होते. देशातील सद्यस्थितीच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती घातक आहे. समाजाचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षणप्रणालीवरदेखील आघात सुरू आहे. अशा स्थितीत सर्व विचारवंतांनी एकत्रित याचा विरोध करण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. विचारांचा सामना विचारांनी होत नाही. धर्मांध विचारांच्या विरोधात आपण कामच करत नाहीत. विचारवंतदेखील जीवाच्या भीतीमुळे लाचार झालेले दिसतात. परंतु मी मात्र लढत राहणार, असे प्रतिपादन बी.जी.कोळसे पाटील यांनी केले.
कुठलाही वादग्रस्त मुद्दा असला तरी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. लोकशाहीमध्ये हेच अपेक्षित आहे. कोणावर आपले म्हणणे लादणे योग्य नाहीच. परंतु कमीतकमी समोरच्याचे मत ऐकून घेण्याची तयारी असली पाहिजे. विचारांच्या बदल्यात जर हिंसेने उत्तर मिळणार असेल तर ही अराजकतेची सुरुवात आहे, असे मानले पाहिजे, असे वक्तव्य प्रा.अपूर्वानंद यांनी केले.
देशभक्ती व देशप्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देशप्रेम मनातून यावे लागते तर देशभक्ती काही वेळा लादल्या दाते. देशात सध्या देशभक्तीवर भर दिला जात आहे.
परंतु समजून व विचार करून देशप्रेम करण्याची गरज असल्याचे कविता कृष्णन म्हणाल्या. वीरा साथीदार यांनी यावेळी परिसंवादाची प्रस्तावना मांडत संचालनदेखील केले.(प्रतिनिधी)