विभागातील धरणे कोरडीच : केवळ ३४.२५ टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:32 AM2018-08-07T00:32:04+5:302018-08-07T00:33:09+5:30
आॅगस्ट महिना सुरू होऊन आठवडा होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. येत्या दीड महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आॅगस्ट महिना सुरू होऊन आठवडा होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. येत्या दीड महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
पावसाळ्याचे दिवस आहे, परंतु काही अपवाद वगळ्यास अजूनही पाऊस पुरेसा झालेला नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात जुलै ६ तारखेला आलेला मुसळधार पाऊस सोडला तर धरणाना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ४ आॅगस्ट रोजी केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा आहे. नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी असून यात १२१७.२७ दलघमी (३४.२५ टक्के) इतकाच जलसाठा आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणाची क्षमता १०१६.८८ इतकी आहे. यात २१९.९० दलघमी म्हणजे २१.६२ टक्के इतका जलसाठा आहे. यासोबतच कामठी खैरीमध्ये ६३.५८ टक्के, रामटेकमध्ये ३४.३९ टक्के, लोवर नांद वणा ५३.७४ टक्के, वडगाव ५६.९६ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ४७.८ टक्के, सिरपूर २६.९७ टक्के, पुजारी टोला ७५.७६ टक्के, कालीसरार ७०.६९ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २- ९.९४ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ९३.४६ टक्के, गडचिरोली जिल्ह्या दिना ६४.५२ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २९.७२ टक्के, धाम ३२.७५ टक्के, पोथरा १०० टक्के, लोअर वर्धा टप्पा १- २८.८० टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ - २८.४ आणि बावनथडी २९.१३ टक्के इतका पाणीसाठा आहे.
पोथरा हाऊसफुल्ल, असोलामेंढा ९३ टक्के भरला
विभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प १०० टक्के भरला. तर चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ९३.४६ टक्के इतक ा भरला आहे. परंतु या दोन्ही प्रकल्पांचा एकूण साठा कमी आहे. पोथराची क्षमता ३५ दलघमी तर असोलामेंढाचा ५२.३३ दलघमी इतका साठा आहे.
येत्या दिवसात धरण भरण्याची शक्यता
जलसंपदा विभागाने जारी केलेल्या एकूण पाणीसाठ्याच्या माहितीनुसार गेल्या वर्षी आजच्याच तारखेचा एकूण पाणीसाठा पाहिला तर तो केवळ २१.७९ टक्के इतकाच होता. तेव्हा आॅगस्ट आणि सप्टेंबर महिना शिल्लक असल्याने येत्या दिवसात धरणे भरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसे झाले नाही तर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.