नागपूर विभागातील धरणे ‘फुल्ल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 10:17 PM2019-09-13T22:17:02+5:302019-09-13T22:18:00+5:30
मुसळधार पावसामुळे नागपूरसह एकूणच विभागातील पाणीटंचाई दूर झाली आहे. नागपूर विभागातील धरणांमध्ये पाणीच पाणी आहे. विभागातील एकूण १८ धरणांपैकी ५ धरणे १०० टक्के तर ५ धरणे ९० टक्केवर भरली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरसह एकूणच विभागातील पाणीटंचाई दूर झाली आहे. नागपूर विभागातील धरणांमध्येपाणीच पाणी आहे. विभागातील एकूण १८ धरणांपैकी ५ धरणे १०० टक्के तर ५ धरणे ९० टक्केवर भरली आहेत.
नागपूर विभागात एकूण मोठी धरणे १८ आहेत. यापैकी गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा, गडचिरोलीतील दिना, आणि वर्धा जिल्ह्यातील धाम व पोथरा ही धरणे १०० टक्के भरली आहेत. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह ९६.१६ टक्के, कामठी खैरी ९४.११ टक्के, वडगाव ९१.४४ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला ९३.०६ टक्के, कालिसरार ९४.८४ टक्के भरली आहेत. यासोबतच लोअर नांद ८५.५६ टक्के, सिरपूर ८५.२१ टक्के, लोअर वर्धा ८२.६६ टक्के इतकी भरली आहेत. उर्वरित धरणांमध्ये रामटेक २९.२३ टक्के, बोर ५६.८४ टक्के, गोसेखुर्द ५०.८७ टक्के, बावनथडी ३४.७१ आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २- ३०.४९ टक्के इतके भरले आहे.
पाच वर्षातील सर्वाधिक साठा
नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास मागील पाच वर्षात यंदा धरणांमध्ये सर्वाधिक पाणीसाठा जमा झाला आहे. विभागातील १८ मोठ्या धरणातील पाणीसाठा क्षमता ३५५२.२६ दलघमी इतकी आहे. आजच्या तारखेला १३ सप्टेंबर रोजी या धरणांमध्ये एकूण २७५८.२४ दलघमी म्हणजेच ७७.६५ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या पाच वर्षातील आजच्याच दिवसातील पाणीसाठ्याचा विचार केल्यास तो कितीतरी अधिक अआहे. उदाहरणार्थ गेल्या वर्षी आजच्या तारखेला केवळ १६४८.०८ दलघमी म्हणजेच ४६.३८ टक्के इतका साठा होता. त्यापूर्वी २०१७ मध्ये ११६५.३५ दलघमी, २०१६ मध्ये २००९.०४ दलघमी, २०१५ मध्ये २३५५.६९ दलघमी आणि २०१४ मध्ये २५४९.१३ दलघमी इतका होता.