धरणे अजूनही कोरडी पाणीकपात सुरूच राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:24 AM2019-07-30T01:24:03+5:302019-07-30T01:24:54+5:30

गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात चांगला पाऊस होत आहे. परंतु तलावांमधील पाण्याच्या साठ्यात अजूनही समाधानकारक वाढ झालेली नाही. त्यामुळे या आठवड्यातही बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पेंचशी जुळलेल्या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. कन्हान नदीशी जुळलेल्या नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज आणि आसीनगर झोनमध्ये पाणी पुरवठा मात्र सुरळीत राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.

The dam will still continue to have dry water cuts! | धरणे अजूनही कोरडी पाणीकपात सुरूच राहणार!

धरणे अजूनही कोरडी पाणीकपात सुरूच राहणार!

Next
ठळक मुद्देनागपूरकरांनो पाणी जपूनच वापरा : नवेगाव खैरीमध्ये दोन आठवड्यात केवळ ०.२४ मीटर वाढला साठा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात चांगला पाऊस होत आहे. परंतु तलावांमधील पाण्याच्या साठ्यात अजूनही समाधानकारक वाढ झालेली नाही. त्यामुळे या आठवड्यातही बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पेंचशी जुळलेल्या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. कन्हान नदीशी जुळलेल्या नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज आणि आसीनगर झोनमध्ये पाणी पुरवठा मात्र सुरळीत राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.
सोमवारी जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, मनोज गणवीर आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तलावांमधील पाणीसाठ्यावर चर्चा झाली. पाणीसाठ्यात कुठलीही वाढ झाली नसल्याने पाणीकपातीचा निर्णय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ ऑगस्टपर्यंत कपातीचा निर्णय अगोदरच घेण्यात आलेला आहे. परंतु दर आठवड्याला आढावा घेण्याचा पर्यायसुद्धा ठेवण्यात आला आहे. त्यानुसार आढावा घेतल्यानंतर कपातीचा निर्णय कायम ठेवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नवेगाव खैरी येथील धरणातील पाणीसाठ्याची पातळी २९ जुलै रोजी ३१८.६० मीटर इतकी होती. दोन आठवड्यापूर्वी १५ जुलै रोजी ती ३१८.३६ मीटर इतकी होती. यात केवळ ०.२४ मीटरची वाढ झाली आहे. ती समाधानकारक नाही. गेल्यावर्षी याच तारखेला धरणातील पाण्याची पातळी ३२२ मीटरपेक्षा अधिक होती. नवेगाव खैरीतून पेंचच्या माध्यमातून नागपूरच्या जलशुद्धीकरण केंद्रात दररोज ५०० एमएलडी पाणी येते. पाण्याची पातळी वाढत नसल्याने पाणीपुरवठा प्रभावित झाला.
जलप्रदाय समितीचे सभापती झलके यांनी सांगितले की, शहरात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. परंतु तलाव परिसरात पाणी नसल्याने तेथील पाणीसाठ्यात फारसा फरक पडलेला नाही. नवेगाव खैरीतील तलावात पाणी नाही आणि तोतलडोह तलावातील परिस्थितीतही सुधारणा नाही. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
पाण्याचे टँकरही बंद
पाणीसंकटादरम्यान कुठल्याही टाकीतून टँकरचे संचालन होणार नाही. त्यामुळे कपातीच्या एक दिवसापूर्वीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. कपातीदरम्यान पाण्याच्या टाकीतही पाणी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे टँकर चालू शकत नाही.
पाणीटंचाईबाबत ‘सोशल मीडिया’तून जनतेशी संवाद : बावनकुळे
सद्यस्थितीत नागपूर शहरात पाणीकपात करण्यात आली असून, एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता, पाण्याचे संकट हे नैसर्गिक आपत्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत तोतलाडोहमध्ये पुरेसे पाणी येत नाही, तोपर्यंत नागपूर शहरात पाणीकपात सुरूच राहणार. जनतेला या संकटाची जाण आहे. लोक सुशिक्षित असून ते संयम बाळगत आहेत. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संकटांची कारणे पटवून सांगू, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसची राज्यात सत्ता असताना त्यांनी चौराईविरोधात अवाक्षर काढले नाही. आता आंदोलन कसे काय करतात, असा प्रश्नदेखील त्यांनी केला.

Web Title: The dam will still continue to have dry water cuts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.