सॅटेलाईट-ड्रोनद्वारे व्हावे नुकसानीचे पंचनामे : राम नेवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 10:26 PM2019-11-04T22:26:05+5:302019-11-04T22:27:50+5:30
अतिवृष्टी व अवकाळी (परतीच्या) पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे हे व्यक्तिश: (मॅन्युअली) न करता ही जुनाट पद्धत बंद करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन कॅमेरा, सॅटेलाईटच्या माध्यमातून हे पंचनामे करावेत, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सोमवारी पत्रपरिषदेद्वारे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अतिवृष्टी व अवकाळी (परतीच्या) पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता शासनाकडून नुकसान भरपाईसाठी करण्यात येणाऱ्या पंचनाम्यांना विलंब होत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान भरपाईचा प्रश्न कायम आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने पंचनामे हे व्यक्तिश: (मॅन्युअली) न करता ही जुनाट पद्धत बंद करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन कॅमेरा, सॅटेलाईटच्या माध्यमातून हे पंचनामे करावेत, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सोमवारी पत्रपरिषदेद्वारे केली.
पावसामुळे विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, धान, भाजीपाला, संत्रा, मोसंबी आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व पिकांचे ८० टक्क्यापर्यंत नुकसान झाले आहे. त्यातच नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे अजून झाले नाही. शेतकऱ्यांना रब्बीसाठी शेती तयार करायची आहे. पंचनामेच झाले नाही तर आर्थिक नुकसान भरपाई मिळणार कधी? अशी एकूण परिस्थिती आहे. अलीकडे सर्वच गोष्टी ऑनलाईन करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. तेव्हा पंचनामेच का जुन्या पद्धतीने व्हावे. ड्रोन किंवा सॅटेलाईटने पंचनामे केल्यास प्रशासनाचा वेळ वाचेल व शेतकऱ्यांनाही योग्य लाभ मिळेल. मात्र, हे सर्व असताना सरकार जाणिवपूर्वक पंचनाम्याची जुनी पद्धत वापरत असल्याचा आरोपही नेवले यांनी केला.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेव्हा सरकारने या सर्व शेतकऱ्यांचे वीज बिलासह सर्व कर्ज सरसकट माफ करावे. याशिवाय शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही केली. पत्रपरिषदेला समितीचे अरुण केदार, गुलाबराव धांडे, शेखर काकडे, विजय मौंदेकर, अनिल केसरवाणी, मुकेश मासूरकर, विष्णू आष्टीकर, अण्णाजी राजेधर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना देणार सडका शेतीमाल भेट
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे वेगवेगळी आंदोलने केली जातात. यातच नागपूर जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक सडले आहे. हा सडलेला शेतीमाल जिल्हधिकाऱ्यांमार्फत सरकारला भेट देऊन सरकार व प्रशासनाने लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वेधण्यासाठी येत्या ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोंब फुटलेल्या पिकांचे नमुने घेऊन निवडक शेतकरी आंदोलनात सहभागी होतील, असे नेवले यांनी सांगितले.