पूर्व विदर्भातील धरणे आटली, आता प्रतीक्षा पावसाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 08:53 PM2019-06-07T20:53:19+5:302019-06-07T20:57:17+5:30
उन्हाळा संपत आला आहे. कधी नव्हे इतकी तीव्र पाणीटंचाई यंदा निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी सात मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत. मोठ्या धरणांमध्ये आजच्या घडीला केवळ सहा टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. लवकर पाऊस न आल्यास भयावह परिस्थितीचा धोका लक्षात घेता नागरिकांसह शासन व प्रशासनालाही पावसाची तीव्रतेने प्रतीक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाळा संपत आला आहे. कधी नव्हे इतकी तीव्र पाणीटंचाई यंदा निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी सात मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत. मोठ्या धरणांमध्ये आजच्या घडीला केवळ सहा टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. लवकर पाऊस न आल्यास भयावह परिस्थितीचा धोका लक्षात घेता नागरिकांसह शासन व प्रशासनालाही पावसाची तीव्रतेने प्रतीक्षा आहे.
नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता २९५६४.४३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला (७ जून रोजी) केवळ १९०.८५ दलघमी (६ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार एकूण १८ पैकी ७ प्रकल्प कोरडे आहेत. तोतलाडोह, नांद वणा, पुजारी टोला दिना, पोथरा, गोसीखुर्द टप्पा १ आणि बावनथडी या प्रकल्पांमध्ये ० टक्के इतका पाणीसाठा आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात ० टक्के इतका पाणीसाठा आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३५ दलघमी (२४.५७ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये ७.८८ टक्के, लोवर नांद ० टक्के, वडगाव प्रकल्पात १२.४१ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात १६.८५ टक्के, सिरपूर १८.८५ टक्के, पुजारी टोला ० टक्के, कालीसरार ४६ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये २.७७ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात २६.२० टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १०.९० टक्के, धाममध्ये ०.७४ टक्के, पोथरामध्ये ० टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये २.९७ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ व बावनथडीमध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.
पाच वर्षातील स्थिती
वर्ष (७ जून रोजी) नोंदवलेला पाणीसाठा
२०१९- १९०.८५ दलघमी
२०१८ - ३८१.५९ दलघमी
२०१७ - ३११.४४ दलघमी
२०१६ - ६८५.८६ दलघमी
२०१५- ७३६.०५ दलघमी
२०१४ - १४७६.२६ दलघमी