आठवडाभरापासून पावसाने मारली दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:07 AM2021-07-01T04:07:12+5:302021-07-01T04:07:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : यंदा खरीप हंगामात अगदी योग्यवेळी मान्सूनचे दमदार आगमन झाले. काही रिमझिम तर काही दिवस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : यंदा खरीप हंगामात अगदी योग्यवेळी मान्सूनचे दमदार आगमन झाले. काही रिमझिम तर काही दिवस मुसळधार पाऊस बरसल्यानंतर आता आठवडाभरापासून पावसाने अचानक दांडी मारली. यामुळे सोयाबीन, कपाशी पिकांवर याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तालुक्यात सर्वत्र १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सर्वांनीच सोयाबीन पेरणीची, कपाशी लागवड आणि धानाची पऱ्हे टाकण्याची कामे उरकविली. जवळपास कामे आटोपते आले असताना उमरेड तालुक्यात पाऊस बेपत्ता झाला. वातावरण बदलाचा पिकांवर विपरीत परिणाम होण्याची संभावना व्यक्त होत आहे. अनेकांच्या शेतात सोयाबीन, कपाशी आणि तुरीचे पीक डोलत आहे. तालुक्यातील नदी-नाल्याच्या काठावरील पिकांचे आधीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांवर दुबार पेरणीचे संकटही आले. या नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करीत अनेकांची दुबार पेरणीसुद्धा आटोपली. आता पावसाची नितांत गरज असताना एक आठवड्यापासून पाऊस गायब झाला. उकाडा कमालीचा वाढला असून, पाऊस अधिक लांबल्यास किडीचा, रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचीही भीती वर्तविली जात आहे.
....
येरे येरे पावसा...
१८ जून रोजी तालुक्यात ३०.२ मिलिमीटर सरासरी पाऊस पडला. त्यानंतर पावसाने आपला रंग बदलविला. अधेमध्ये शिरव्यासह तुरळक पाऊस काही ठिकाणी झालेला आहे. १९ जून रोजी तालुक्यात ३.३७ मिलिमीटर पाऊस झाला. २१ जून (०.६ मिमी), २३ (२१.१८), २५ (६.८), २७ (७.२७), २८ (१.८८), २९ (०.५७) असा तालुक्यात पाऊस पडला. या तारखेच्या दरम्यान पावसाचा थेंबही पडला नाही. उमरेड सर्कलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ३६७.७८ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. पाचगाव सर्कलमध्ये १५०.९, बेला सर्कल २५६.४, सिर्सी २६०, हेवती १७७.८ मिलिमीटर आणि मकरधोकडा येथे ११४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आतापर्यंत तालुक्यात २२१.११ मिलिमीटर पाऊस पडला. फारच अल्प पाऊस झाल्याने आणि अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने येरे येरे पावसा म्हणण्याची वेळ सर्वांवर येऊन ठेपली आहे.
....
उष्ण व कोरड्या वातावरणामुळे खोडमाशी, तंबाखूची पाने खाणारी अळी, उंटअळी यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळल्यास रासायनिक किटकनाशकांची फवारणी आवश्यक आहे.
- संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, उमरेड