विकास महात्मे करताहेत धनगर समाजाची दिशाभूल ; विक्रम ढोणे यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 08:05 PM2019-01-03T20:05:18+5:302019-01-03T20:08:37+5:30
भाजपचे खा. डॉ. विकास महात्मे हे धनगर समाजाला एसटीचे सर्टिफिकेट मिळवून देणार होते. परंतु त्यांनी स्वत:साठी खासदारकी मिळवली. ते सुरुवातीपासूनच धनगर समाजाची दिशाभूल करीत असून त्यांचा हा कार्यक्रम आजही धूमधडाक्यात सुरू आहे, अशी टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेद्वारे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भाजपचे खा. डॉ. विकास महात्मे हे धनगर समाजाला एसटीचे सर्टिफिकेट मिळवून देणार होते. परंतु त्यांनी स्वत:साठी खासदारकी मिळवली. ते सुरुवातीपासूनच धनगर समाजाची दिशाभूल करीत असून त्यांचा हा कार्यक्रम आजही धूमधडाक्यात सुरू आहे, अशी टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेद्वारे केली.
ढोणे म्हणाले, धनगरांच्या एसटी आरक्षणाची मागणी जुनी आहे. १९७९ ला महाराष्ट्र सरकारने हे आरक्षण देण्यासंबंधी केंद्र सरकारला शिफारस केली होती. मात्र निकष पूर्ण होत नसल्याने ती १९८१ ला परत घेण्यात आली. त्यानंतर अनेकांनी प्रयत्न केले. परंतु कुणीही हा विषय सोडवू शकले नाही. राजकीय मंडळींकडून सातत्याने ‘व्होटबँक पॉलिटिक्स’साठी या विषयाचा वापर करण्यात आला. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपने हा खेळ अतिशय नियोजनपूर्वक खेळला. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने डॉ. विकास महात्मे यांना ‘मोहरा’ बनवून समाजात सोडले. सर्व ताकद वापरून त्यांचे नेतृत्व प्रस्थापित केले. मतांचे राजकारण साध्य झाल्यावर त्यांना योग्यवेळी पक्षात घेऊन खासदारकीची बिदागी दिली. खा. महात्मे यांनी नुकतीच राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यावेळी धनगर हे एसटीत आधीपासूनच आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे राज्यघटनेचा अवमान होत आहे. आपण स्वत: लक्ष घालून ही अंमलबजावणी करावी’अशी मागणी केली. परंतु हीच मागणी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून करतील का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
खा. महात्मे यांच्या धनगर समाज संघर्ष समितीने ४ जानेवारी २०१५ रोजी मेळावा घेतला होता. त्याला चार वर्षे पूर्ण होत आहे. याच मेळाव्यात धनगर आरक्षणाबरोबर डॉ. महात्मे यांना राज्यसभा खासदार करा, अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणी दीड वर्षात पूर्ण झाली. ३१ मे २०१६ ला डॉ. महात्मे खासदार झाले. ते संसदेत गेल्यावर एकदोनदा प्रश्न मांडण्याशिवाय काही करू शकले नाही. डॉ. महात्मे यांच्या खासदारकीमुळे आरक्षणाचा विषय कणभरही पुढे गेलेला नाही. त्यांनी समाजाला अंधारात ठेवून खासदारकी मिळवली, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
धनगर विवेक जागृती अभियानाद्वारे आरक्षणाबद्दल सुरू असलेल्या या धुळफेकीबाबत समाजात जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.