उंच इमारतींमुळे विमानांना धोका : २९ इमारतींची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 20:40 IST2020-09-24T20:39:03+5:302020-09-24T20:40:43+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या उंच इमारतींमुळे विमानाचे लॅण्डिंग आणि उड्डाणाला धोका निर्माण झाला आहे. विमानतळ प्रशासनाने कारवाईसाठी या इमारतींच्या मालकांना अनेकदा नोटिसा बजावल्या आहेत. पण अद्यापही कारवाई झालेली नाही. विमानाला धोका असलेल्या २९ इमारतींची ओळख झाली आहे.

उंच इमारतींमुळे विमानांना धोका : २९ इमारतींची ओळख
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या उंच इमारतींमुळे विमानाचे लॅण्डिंग आणि उड्डाणाला धोका निर्माण झाला आहे. विमानतळ प्रशासनाने कारवाईसाठी या इमारतींच्या मालकांना अनेकदा नोटिसा बजावल्या आहेत. पण अद्यापही कारवाई झालेली नाही. विमानाला धोका असलेल्या २९ इमारतींची ओळख झाली आहे.
या समस्येवर विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेड आणि मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये पूर्वी बैठक झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे या इमारतींची पाहणी करण्यात येईल आणि उंचीचे उल्लंघन झाले असल्यास बांधकाम तोडण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले. तसे पाहता विमानतळ परिसराच्या ठराविक अंतरावर बांधकाम करण्यात येणाºया इमारतींसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. हा नियम संपूर्ण देशात लागू आहे. प्राधिकरणाने विमानतळलगतच्या परिसरात इमारत बांधण्यासाठी उंची ठरवून दिली आहे. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन करून उंच इमारत उभ्या राहिल्या आहेत. उंचीसाठी मालकाने प्राधिकरणाची मंजुरी घेतलेली नाही. आता त्या विमानासाठी धोकादायक ठरल्या आहेत.
अनेकदा सर्वेक्षण
विमानतळालगतच्या उंच इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या गंभीर प्रश्नावर अनेकदा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणासह खासगी कंपनीतर्फेही इमारतींचे सर्वेक्षण करून वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे. पण त्यानंतरही कारवाई झालेली नाही. मर्यादेपेक्षा जास्त उंच इमारतींच्या बांधकामाला प्राधिकरणाने परवानगी दिलीच नाही. अशा स्थितीत कारवाईसाठी प्राधिकरणाचे अधिकारी कुणाची वाट पाहात आहेत वा कारवाई करणार किंवा नाही, यावरही संभ्रम असल्याचे सूत्रांनी सांगितले. कारवाईसाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेता येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.