डेंग्यूचा धोका, नागपुरात चार दिवसांत १८० रुग्ण
By सुमेध वाघमार | Published: September 4, 2023 10:04 PM2023-09-04T22:04:41+5:302023-09-04T22:05:18+5:30
दररोज ४६४ संशयित रुग्णांची भर : ४८ घरांना बजावली नोटीस
सुमेध वाघमारे
नागपूर : डेंग्यूचा धोका वाढतच चालला आहे. मागील चार दिवसांत १८० नव्या रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली आहे. पावसाच्या उघडझापमुळे डासांचा प्रादूर्भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर शहरात ऑगस्ट महिन्यात डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या २ हजार ८४२ होती तर डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२४ होती. परंतु ४ सप्टेंबरपर्यंत रुग्णसंख्या २४०ने वाढली. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. रुग्ण आढळून आलेल्या व परिसरातील घरांची तपासणी करून किटकनाशक फवारणी, गप्पी मासे आणि जमा झालेले पाणी फेकून दिले जात आहे. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने आज सोमवारी ४ हजार ८७९ घरांची तपासणी केली. त्यात ११० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. वारंवार अळ्या आढळून आलेल्या ४८ घरांना नोटीस बजावण्यात आली.
डेंग्यूच्या विळख्यात रोज १२ रुग्ण
जानेवारी ते ४ सप्टेंबरपर्यंत डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या ४०४ झाली आहे. यावरून रोज डेंग्यूच्या विळख्यात रोज १२ रुग्ण सापडत असल्याचे दिसून येते. शिवाय रोज ४६४ संशयित रुग्ण आढळून येत आहेत.