पाच दिवस विदर्भ, मराठवाड्याला उष्ण लहरींचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 08:35 PM2022-03-29T20:35:07+5:302022-03-29T20:36:47+5:30
Nagpur News विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पुढचे चार दिवस उष्ण लहरींचा धाेका राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नागपूर : विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पुढचे चार दिवस उष्ण लहरींचा धाेका राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी चंद्रपूर ४३.४ अंश व अकाेल्याचे तापमान ४३.१ अंशावर गेल्याने हवामान विभागाने त्याचे संकेतही दिले आहेत. गडचिराेली वगळता सर्व जिल्ह्यांचे तापमान ४१ अंशांच्या आसपास पाेहोचले आहे. मराठवाड्यातील जिल्हेही प्रकाेपात आले आहेत. किमान २ एप्रिलपर्यंत वातावरणाची ही स्थिती राहणार आहे.
हवामान विभागाने महाराष्ट्रात सरासरी तापमानात २ ते ४ अंशांनी व विदर्भात ५ ते ६ अंशांनी वाढ हाेण्याचे संकेत दिले हाेते. अंदाजाप्रमाणे मंगळवार अत्यंत तापदायक ठरला. अकाेला व चंद्रपूरचे तापमान सरासरीपेक्षा ४.३ अंशाने जास्त वाढले आहे. दुसरीकडे नागपुरात ३.५ अंशांची वाढ हाेत कमाल तापमान ४१.५ अंशांवर पाेहोचले. ४२.४ अंशांसह वर्धा त्यापेक्षा हाॅट हाेता. याशिवाय यवतमाळ, वाशिम ४१.५ अंश, अमरावती ४१.६ अंश, गाेंदिया ४०.८ अंश तर बुलढाणा ४०.२ अंशांवर हाेते.
मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांत तापमान ४१ अंशांवर पाेहोचले आहे. परभणी, औरंगाबाद येथील तापमान सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशांच्या उच्चांकीवर गेले आहे. पुणे विभागात पुणे, साेलापूरलाही उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. सातारा, नाशिक, काेल्हापूरमध्येही सूर्याची आग वाढली आहे.
अतिनील किरणांची तीव्रता वाढली
तापमानाची तीव्रता अधिकाधिक वाढत जाणार आहे. २ एप्रिलपर्यंत पाच दिवस उष्ण लहरींचा सामना करावा लागणार आहे. वेधशाळेच्या निरीक्षणानुसार सूर्याच्या अतिनील किरणांची तीव्रताही वाढली आहे. ही धाेकादायक स्थिती झाल्याने दुपारी विनाकारण घराबाहेर फिरणे टाळा, जास्तीत जास्त सावलीत राहण्याचा प्रयत्न करा, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.