दगड कोसळण्याचा धोका : पाटणसावंगी-वाकी मार्ग बनला मृत्युमार्ग
By admin | Published: December 29, 2014 02:44 AM2014-12-29T02:44:47+5:302014-12-29T02:44:47+5:30
सावनेर मार्गावरील पाटणसावंगी वाकी हे तीर्थस्थळ आहे. श्री ताजुद्दीनबाबा यांच्या पवित्र वाकी दर्ग्यात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी जातात.
मनोज तळवतकर कोराडी
नागपूर - सावनेर मार्गावरील पाटणसावंगी वाकी हे तीर्थस्थळ आहे. श्री ताजुद्दीनबाबा यांच्या पवित्र वाकी दर्ग्यात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी जातात. रोजच्या वर्दळीचा हा मार्ग ‘मृत्युमार्ग’ बनलेला आहे. डोंगर खोदून तयार करण्यात आलेल्या या मार्गावरील मोठे दगड कोसळून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
वाकी येथे ये-जा करण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे. डोंगर खोदून रस्ता तयार करण्यात आला. या पूर्वी मार्गावर ‘यू-टर्न’ वळणाचा रस्ता होता. त्यामुळे अनेकदा अपघात झाले. यावर पर्याय म्हणून मोठे दगडी पहाड खोदून रस्ता तयार करण्यात आला. त्यानंतर हा मार्ग अधिकच धोकादायक झाला आहे. अत्याधुनिक मशीनच्या साह्याने पहाड खोदण्यात आले. सदरचे खोदकाम व्यवस्थित झाले नसल्याने रस्त्याच्या कडेलाच मोठमोठे दगड आहेत, शिवाय हा रस्ता अतिशय अरुंद आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना दगड कोसळतात की काय असा भास निर्माण होतो. या ठिकाणी क्षणभर थांबल्यास भीतीदायक चित्र उभे राहते.
पावसाळ्यात येथील चित्र वेगळे असते. कोसळणाऱ्या पावसाच्या लोटासोबत भुसभुशीत मुरुममिश्रित माती कोसळताना दिसते. अशावेळी मोठा दगड व दरड कोसळून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यासाठी पहाड खोदून दोन वर्षांचा काळ उलटला. परंतु या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.
वाकी येथे वर्षातून दोनवेळा उर्स उत्सवाचे आयोजन केले जाते. येथे विविध राज्यांसह देश-विदेशातून जवळपास पाच लाख भाविक दर्शनासाठी येतात. परिसरातील गावातील विद्यार्थी पाटणसावंगी येथे सायकलने शिकायला जातात. शेतकरी, मजूर व नोकरवर्गही ये-जा करण्यासाठी हाच मार्ग वापरतात. त्यामुळे रस्त्यावर नेहमी वर्दळ असते.
या मार्गावरून जड वाहने अथवा क्रेन, मशीन, पोकलॅण्ड आदी वाहने गेल्यास दरडीच्या ठिकाणी कंपन तयार होते, शिवाय पहाडावरील दगडही हलतात. त्यामुळे दगड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनुचित घटना टाळण्याकरिता प्रशासनाने या ठिकाणी सिमेंटची संरक्षण भिंत अथवा लोखंडी रेलिंग लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.