नदी-नाल्यांच्या काठावरील हजारो लोकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:07 AM2021-07-26T04:07:32+5:302021-07-26T04:07:32+5:30

लोकमत न्यूज् नेटवर्क नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचा दावा केला जातो. दुसरीकडे शहरातील नदी ...

Danger to thousands of people on the banks of rivers and streams | नदी-नाल्यांच्या काठावरील हजारो लोकांना धोका

नदी-नाल्यांच्या काठावरील हजारो लोकांना धोका

Next

लोकमत न्यूज् नेटवर्क

नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचा दावा केला जातो. दुसरीकडे शहरातील नदी व नाल्यांना ठिकठिकाणी सुरक्षा भिंत नसल्याने तसेच भिंती जीर्ण झाल्याने अतिवृष्टी झाल्यास शहरातील हजारो लोकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबईसह कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे शंभराहून अधिक लोकांचे बळी गेले. नागपुरात अतिवृष्टी झाल्यास सुरक्षा भिंत नसलेल्या नदी व नाल्यांच्या काठावरील लोकांना धोका निर्माण होऊ शकतो. कोरोना संक्रमणामुळे गेल्या वर्षभरात विकासकामे जवळपास ठप्पच होती. नदी व नाल्यांना संरक्षक भिंती उभारण्याचे काम ठप्पच होते. तास-दोन तासात ८ जुलै रोजी झालेल्या जोराच्या पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांत पाणी साचले होते. याचा विचार करता नदी-नाल्यांना पूर आला तर शहरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नाल्यांना संरक्षण भिंती उभारण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. परंतु याची दखलच घेतली जात नाही. शहरात ८०हून अधिक ठिकाणी सुरक्षा भिंती नाही.

....

अर्थसंकल्पातील तरतूद जाते कुठे?

शहरातून वाहणाऱ्या नाग, पिवळी व पोहरा या नद्यांसह नाल्यांना ठिकठिकाणी सुरक्षा भिंत नाही तर काही ठिकाणच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी निधीची तरतूद केली जाते. परंतु सुरक्षा भिंती उभारल्या जात नाहीत. पदाधिकारीही याबाबत फारसे गंभीर दिसत नाही.

सिमेंट रस्त्यांसाठी कोट्यवधीचा निधी

शहरातील विकासकामे ठप्प आहेत. सिवरेज, पावसाळी नाल्या दुरुस्ती अशा किरकोळ कामासाठीही निधी उपलब्ध होत नाही. दुसरीकडे सिमेंट रस्त्यांसाठी मात्र निधी उपलब्ध केला जातो. सिमेंट रस्त्यांच्या तीन टप्प्यात ६०० कोटींचा निधी खर्च केला जात आहे. यातील ४०० कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात आला. मात्र नदी व नाल्याच्या सुरक्षा भिंतीसाठी निधी दिला जात नाही.

....

दोन वर्षापासून भिंत दुरुस्तीची मागणी

उत्तर नागपुरातील पिवळी नदी भागात कृष्णानगर, शीलानगर, रमाईनगर या भागातील नाल्यावर भिंत खचली असून, ती गेल्या दोन वर्षांपासून पडक्या अवस्थेत आहे. वेळोवेळी मागणी करूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अशोक चौक ते रेशीमबाग चौक परिसरात सुरक्षा भिंत बांधण्याचा प्रस्ताव असताना अजूनही ती बांधण्यात आली नाही. पारडी भागात शाळेलगत संरक्षक भिंत नाही. यामुळे दुर्घटना होण्याचा धोका आहे.

...

सुरक्षा भिंत नसलेले परिसर

यशवंत स्टेडियम, नंदनवन झोपडपट्टी, शांतीनगर, सिरसपेठ, रविनगर वसाहत, गवळीपुरा, बजरंगनगर, शेषनगर, पँथरनगर झोपडपट्टी, इंदिरा गांधी नगर झोपडपट्टी, कस्तुरबा सोसायटी, नयापूर, बालाजीनगर, दहीबाजार. बोरनाला, कृष्णानगर, शीलानगर, कुशीनगर, गुलशननगर, पिवळी नदी ओव्हर ब्रिज, चांभार नाल्याजवळील परदेशी मोहल्ला, डोबीनगर. खदान, इंदिरा मातानगर, न्यू मंगळवारी, शांतीनगर, राहुलनगर, मुळीक कॉम्प्लेक्स, कर्वेनगर, समर्थनगरी, नंदनवन, राहतेकर वाडी, पारडी, कुंदनलाल गुप्तानगर, जोगीनगर, काशीनगर, बालाजीनगर, भीमनगर, आदिवासीनगर, जंबुदीपनगर रमाईनगर, जागृत नगर, डोबीनगर. बोरनाला, शीलानगर, दहीबाजार.

Web Title: Danger to thousands of people on the banks of rivers and streams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.