मेडिकलचा घातक जैविक कचरा भंगारात

By admin | Published: May 16, 2017 02:02 AM2017-05-16T02:02:48+5:302017-05-16T02:02:48+5:30

वेगवेगळ्या शस्त्रक्रियेनंतर निकामी झालेले शरीरातील अवयव किंवा ट्युमर, इंजेक्शन, आयव्ही बॉटल, प्लास्टर, कापूस, बॅन्डेज, सिरिंज, पेशंटशी संपर्कात आलेल्या ...

Dangerous biological waste of medical waste | मेडिकलचा घातक जैविक कचरा भंगारात

मेडिकलचा घातक जैविक कचरा भंगारात

Next

विघटन केंद्रापर्यंत पोहचण्यापूर्वीच कचऱ्याची होते विक्री : नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात
सुमेध वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगवेगळ्या शस्त्रक्रियेनंतर निकामी झालेले शरीरातील अवयव किंवा ट्युमर, इंजेक्शन, आयव्ही बॉटल, प्लास्टर, कापूस, बॅन्डेज, सिरिंज, पेशंटशी संपर्कात आलेल्या आणि उपचार करताना वापरलेली प्रत्येक वस्तू ‘बायो-मेडिकल वेस्ट’ (जैविक कचरा) मध्ये मोडते. हा घातक कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्याचा नियम आहे. मात्र विघटन केंद्रापर्यंत पोहचण्यापूर्वीच हा कचरा भंगार व्यावसायिकांना विकला जात असून, यातून होत असलेल्या संसर्गामुळे व आजारांमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य जपणे व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी ‘बायो-मेडिकल वेस्ट हॅन्डलिंग रुल्स’अर्थात जैव वैद्यकीय कचरा हाताळणी नियमावली १९९८ मध्ये तयार करण्यात आली. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने २० जुलै १९९८ रोजी अधिसूचना काढून हे नियम जारी केले. यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी जागा, पाणी, रस्ता व वीज पुरवठा करून जैविक कचरा विघटनाचा प्रकल्प उभारावा आणि डॉक्टर व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नियमांचे पालन केले जाते की नाही, याची देखरेख राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी, असे म्हटले गेले. त्यानुसार महापालिकेने २००४ पासून ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’ला ३० वर्षांसाठी सर्व रुग्णालयातून जैविक कचरा गोळा करणे आणि त्याचे विघटन करण्याचे कंत्राट दिले. या संस्थेने जैव कचरा विघटनाचा प्रकल्प भांडेवाडी डम्पिंग स्टेशन येथे उभारला आहे. ही संस्था उपराजधानीतील मेडिकल, मेयो, डागा, महापालिकेच्या इस्पितळांसह खासगी सुमारे ५०० इस्पितळांतून कचरा गोळा करते. या सेवेसाठी ही संस्था प्रत्येक रुग्णालयातील एका खाटेमागे ठराविक शुल्क आकारते. या संस्थेकडून महापालिकेला ‘रॉयल्टी’ही मिळते. ही संस्था प्रामाणिक काम करीत असली तरी काही मेडिकलचे सफाई कर्मचारी ५०-१०० रुपयांसाठी हा जैविक कचरा भंगार व्यावसायिकांना विकतात.

अशी होते जैविक कचऱ्याची विक्री
मेडिकलच्या वॉर्डावॉर्डात, शस्त्रक्रिया गृहात, प्रयोगशाळेत व अपघात विभागात रुग्णाने वापरलेले इंजेक्शन, सिरिंज, सलाईनच्या बॉटल्स, रबरी नळ्या, ग्लोव्हज आदी साहित्य लाल रंगाच्या प्लास्टीक पिशवीत जमा करून ठेवल्या जातात तर रुग्णांचे कापलेले अवयव, रक्ताचे बँडेज, कापूस, कपडे हे काळ्या रंगाच्या प्लास्टीक पिशवीत जमा केले जातात. सकाळी ८ वाजता मेडिकलच्या सफाई कामाला सुरुवात होते. त्यावेळी या पिशव्या सफाई कर्मचारी मेडिकलच्या ‘लाँड्री’ विभागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जमा करतात. साधारण ११ वाजेपर्यंत चांगलाच ढीग जमा होतो. त्यावेळी काही ओळखीचे भंगार व्यावसायिक रिक्षा घेऊन येतात. सफाई कर्मचाऱ्याला एका लाल पिशवीच्या मागे ५० रुपये देऊन हव्या तेवढ्या पिशव्या पांढऱ्या रंगाच्या पोत्यात भरतात. साधारण १५-२० मिनिटात अर्धेअधिक प्लास्टिकच्या पिशव्या हातरिक्षाच्या मदतीने भंगार दुकानांकडे रवाना झालेल्या असतात. दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान हा कचरा घेऊन जाण्यासाठी ‘सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थे’चा ट्रक येतो, परंतु तोपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त कचरा भंगारात पोहचलेला असतो. रोज ३० ते ४० प्लास्किटच्या बॅग भंगारात विकल्या जात असल्याची माहिती आहे.

झोपडपट्टीत जैविक कचऱ्याचे ढीग
शहरातील अनेक झोपडपट्टीत भंगार व्यावसायिकांनी आपले बस्तान मांडले आहे. या भंगार व्यावसायिकांकडे जैविक कचऱ्याचे ढीग नेहमीच दिसून येतात. मात्र याकडे अद्यापही कुणाचेच लक्ष जात नाही. मनपाच्या आरोग्य विभागाला याची माहिती असून यावर ना महानगरपालिकेचा अंकुश आहे ना प्रदूषण नियंत्रण मंडळाचा.

Web Title: Dangerous biological waste of medical waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.