खतरनाक गुन्हेगाराचा तीन कैद्यांवर खुनी हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:05+5:302021-06-21T04:07:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीत आतापावेतोचे सर्वांत मोठे हत्याकांड घडवून आणणारा खतरनाक गुन्हेगार विवेक गुलाबराव पालटकर (वय ३७) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत आतापावेतोचे सर्वांत मोठे हत्याकांड घडवून आणणारा खतरनाक गुन्हेगार विवेक गुलाबराव पालटकर (वय ३७) याने शनिवारी सायंकाळी कारागृहातील तिघांवर खुनी हल्ला चढविला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून दोघे उपचारानंतर धोक्याबाहेर आले आहेत. या घटनेमुळे कारागृहात प्रचंड खळबळ उडाली आहे.
विवेक पालटकर याने जून २०१८ मध्ये नागपूरला हादरविणारे थरारक हत्याकांड घडवून आणले होते. आराधना नगरात राहणारी त्याची सख्खी बहीण, जावई आणि तिची मुले अशा पाच जणांची पालटकरने निर्घृण हत्या केली होती. यानंतर तो पंजाबमध्ये पळून गेला होता. सध्या उत्तराखंडमध्ये उपमहानिरीक्षक असलेले आणि तेव्हा नागपुरात परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त म्हणून कर्तव्यावर असलेले डॉ. नीलेश भरणे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी पालटकर याला पंजाबमधून अटक करून नागपुरात आणले होते. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला कारागृहात डांबण्यात आले. तेव्हापासून तो येथील मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. त्याला बडी गोल बराक क्रमांक सातमध्ये ठेवण्यात आले होते.
थंड डोक्याचा गुन्हेगार असलेल्या पालटकरच्या कुरबुरी तेथेही सुरू होत्या. मात्र कारागृह अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत त्या पोहोचत नसल्याने त्याच्यावर कारवाई झाली नव्हती. शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास कारागृह बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली. कारागृहातील अधिकारी आणि रक्षक प्रत्येक बराकीत पाहणी करीत असताना बडी गोल बराक क्रमांक ७ मध्ये आरोपी पालटकर राजू मोहनलाल वर्मा (वय ५४) नामक हत्येच्या आरोपातील गुन्हेगारावर हल्ला करताना दिसला. त्याच्या हातातील कपड्यांंत त्याने दगड बांधून ठेवले होते. या दगडाचे फटके तो वर्मा याच्या डोक्यावर मारत असल्याने वर्मा रक्ताने न्हाऊन निघाला होता. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पुढे आलेल्या अन्य दोन कैद्यांवरही आरोपी पालटकरने असाच हल्ला चढवला. त्यामुळे गणेश ठाकूर आणि आत्माराम रा. नामक कैदी गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे कारागृहात प्रचंड खळबळ उडाली. कारागृह अधिकारी आणि रक्षकांनी लगेच आरोपी पालटकरला ताब्यात घेऊन वर्मा, ठाकूर आणि रा. या तिघांची त्याच्या तावडीतून सुटका केली. गंभीर जखमी झालेल्या वर्मा याला तातडीने ॲम्ब्युलन्समध्ये घालून मेडिकलला नेण्यात आले. अन्य दोन जखमीवर कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.
----
अंडासेलमध्ये डांबले
या घटनेमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली. घटनेनंतर कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांच्या आदेशावरून आरोपी पालटकर याला अंडासेलमध्ये डांबण्यात आले. त्याच्यासारखेच अन्य काही कैदीही अंडासेलमध्ये हलविण्यात आले.
---
धंतोलीत गुन्हा दाखल
रात्री उशिरापर्यंत या संबंधाने कारागृह मुख्यालयात आणि वरिष्ठांना माहिती देण्याचे काम सुरू होते. त्यानंतर कारागृह प्रशासनातर्फे हेमंत गोविंद इंगोले यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून धंतोली पोलिसांनी मध्यरात्री आरोपी पालटकरविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमी वर्मा याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
---