खळबळजनक! नागपुरात जेलब्रेकमधील खतरनाक गुंडाचा जेलरवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 08:23 PM2022-02-22T20:23:02+5:302022-02-22T20:24:50+5:30
Nagpur News कारागृहाची भक्कम तटबंदी तोडून सात वर्षांपूर्वी चार साथीदारांसह कारागृहातून पळून गेलेला खतरनाक गुंड शोएब सलिम खान (वय ३०) याने येथील मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंगाधिकारी हेमंत गोविंदराव इंगोले (वय ३२) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
नागपूर - कारागृहाची भक्कम तटबंदी तोडून सात वर्षांपूर्वी चार साथीदारांसह कारागृहातून पळून गेलेला खतरनाक गुंड शोएब सलिम खान (वय ३०) याने येथील मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंगाधिकारी हेमंत गोविंदराव इंगोले (वय ३२) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यानंतर कारागृहातील कर्मचाऱ्यांनी शोएबला आवरून त्याची बेदम धुलाई केली. सोमवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने कारागृह परिसरात एकच खळबळ उडाली होती.
कुख्यात राजा गाैस टोळीचे नंबरकारी शिबू उर्फ शोएब सलिम खान, प्रेम उर्फ नेपाली शालिकराम खत्री, सर्मेंद्र उर्फ राहुल राजबहादूर गुप्ता (वय २५, रा. कामठी, नागपूर), बिशनसिंग रम्मूलाल उके (रा. धुमाळ, जि. शिवनी मध्य प्रदेश) आणि गोलू उर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर (वय २३, रा. नागपूर) हे खतरनाक कैदी ३१ मार्च २०१५ च्या पहाटे मध्यवर्ती कारागृहातून पळून गेले होते. या जेलब्रेकने त्यावेळी देशभर खळबळ उडवून दिली होती. दीड महिन्यानंतर शिबूला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर सर्व आरोपी क्रमश गजाआड झाले. २४ डिसेंबर २०१९ ला या पाचही आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास ठोठावला होता.
दरम्यान,अन्य गुन्ह्यांतही आरोपींचा सहभाग असल्याने शोएब कारागृहातच बंद आहे. १७ फेब्रुवारीला तुरुंगाधिकारी इंगोले यांनी बराकीची नियिमत झडती घेतली असता त्यांना ८ इंच लांबीची टोकदार तार आणि काही टॅबलेटस् मिळाल्या. त्या जप्त करून इंगोलेने शोएबला ‘गरम’ केले होते. त्यामुळे तो इंगोलेंवर चिडून होता. या पार्श्वभूमीवर, सोमवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास इंगोले कारागृहातील सर्कलमध्ये कार्यालयीन कामकाज करीत असताना अचानक शोएब त्यांच्या अंगावर धावून आला आणि त्याने इंगोलेंना बेदम मारहाण केली. इंगोलेचे अन्य सहकारी कर्मचारी तसेच काही कैदी मध्ये पडले आणि त्यांनी शोएबला आवरले. यावेळी जोरदार झटापट झाली. त्यानंतर शोएबची बेदम धुलाई करण्यात आली. या घटनेची कारागृह प्रशासनातर्फे अधीक्षक अनुप कुमरे यांनी चाैकशी केल्यानंतर तुरुंगाधिकारी इंगोले यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
शोएब पोहचला ईस्पितळात
या घटनेनंतर जबर दुखापत झाल्यामुळे शोएबला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी त्याच्यावर उपचार करीत आहेत.
---