धोकादायक : नागपुरातील हवा झाली विषारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 12:36 AM2018-11-09T00:36:02+5:302018-11-09T00:38:34+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली. रात्री उशिरापर्यंत फटाके फुटण्याचे आवाज येत होती. केंद्रीय प्रदूषण कंट्रोल बोर्डाने घोषित केलेल्या प्रदूषणाच्या आकड्यावरून दिवाळीच्या दिवशीची नागपुरातील हवा दमा व हृदयरुग्णांसाठी घातक होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली. रात्री उशिरापर्यंत फटाके फुटण्याचे आवाज येत होती. केंद्रीय प्रदूषण कंट्रोल बोर्डाने घोषित केलेल्या प्रदूषणाच्या आकड्यावरून दिवाळीच्या दिवशीची नागपुरातील हवा दमा व हृदयरुग्णांसाठी घातक होती.
केंद्रीय प्रदूषण कंट्रोल बोर्डाने दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणाची नोंद घेण्यासाठी देशातील सर्व शहरांमध्ये यंत्रणा उभारली होती. प्रदूषणाच्या केलेल्या मॉनिटरिंगमध्ये सर्वच शहरातील स्थिती चिंताजनकच होती. प्रदूषणाच्या आकडेवारीनुसार दिल्ली, आग्रा, नोएडा या शहरात प्रदूषणाचा स्तर घातक झालेला दिसतोय. मात्र नागपूरच्या आकडेवारीला बोर्डाने नियंत्रण स्थितीत असल्याचा हवाला दिला आहे. बोर्डाने शहरातील प्रदूषणाची मात्र १६९ पीएम नोंद केली आहे. बोर्डाचे म्हणणे आहे की, हे प्रदूषण दमा आणि हृदयरोगाच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते.
फक्त सिव्हिल लाईनमध्येच केली नोंद
केंद्रीय प्रदूषण बोर्डाने नोंदविलेल्या आकड्यावर पर्यावरणवादी संस्थांनी आक्षेप घेतला आहे. ग्रीन विजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी यांच्या मते बोर्डाने केवळ शहरातील एकाच परिसरात मॉनिटरींग केले. बोर्डाने केवळ सिव्हिल लाईन परिसराच्याच नोंदी घेतल्या. मात्र हा परिसर शहरातील सर्वात ग्रीन परिसर आहे. सरकारी कार्यालयांची संख्या भरपूर आहे. परिसरात लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे नागपूरचा प्रदूषणाचा स्तर नियंत्रणात आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. शहरातील अन्य भागात दाट वस्त्यांमध्ये हा आकडा २०० पीएमच्या वर जाऊ शकतो.
दोन वर्षात सर्वाधिक
बोर्डाच्या आकड्यानुसार गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी जास्त प्रदूषण नोंदल्या गेले. २०१७ च्या दिवाळीत १२७ ते १६१ पीएमपर्यंत प्रदूषण होते. २०१६ मध्ये १०४ ते ११० पीएम पर्यंत प्रदूषणाची मात्रा होती. फटाक्यांमुळे वाढलेल्या प्रदूषणाच्या आकडेवारीनुसार न्यायालयाच्या निर्देशाचे पालन झाले नाही, हेच दिसून येते.