हृदय रोगावर स्वत:हून औषधी घेणे धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:41 PM2019-06-10T22:41:18+5:302019-06-10T22:44:03+5:30
हृदय रोगावर स्वत:हून औषधी घेणे हे दुसऱ्या आजाराला आमंत्रण देणारे आहे. अनेकदा काही रुग्ण जराही छातीत दुखू लागले, की ‘अॅस्प्रीन’ नावाची गोळी घेतात. मुळात ही गोळी रक्त पातळ करते. त्यामुळे अवयवांमध्ये, मेंदूत अतिरिक्त रक्तस्राव होण्याची जोखीम बळावते. यामुळे अशा कुठल्याही गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक आहे, अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज मनोरिया यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हृदय रोगावर स्वत:हून औषधी घेणे हे दुसऱ्या आजाराला आमंत्रण देणारे आहे. अनेकदा काही रुग्ण जराही छातीत दुखू लागले, की ‘अॅस्प्रीन’ नावाची गोळी घेतात. मुळात ही गोळी रक्त पातळ करते. त्यामुळे अवयवांमध्ये, मेंदूत अतिरिक्त रक्तस्राव होण्याची जोखीम बळावते. यामुळे अशा कुठल्याही गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक आहे, अशी माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज मनोरिया यांनी दिली.
कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, विदर्भ शाखेतर्फे ‘बेस्ट ऑफ कार्डिओलॉजी’ या दोन दिवसीय वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी होण्यासाठी डॉ. मनोरिया आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, विदर्भ शाखेचे अध्यक्ष डॉ. अनुज सारडा, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अजीज खान, डॉ. सजपाल अर्नेजा, डॉ. मुकुंद देशपांडे, डॉ. प्रदीप देशमुख, डॉ. विकास बिसेन, डॉ. राम घोडेस्वार व डॉ. पंकज हरकुट आदी उपस्थित होते.
डॉ. मनोरिया म्हणाले, कुटुंबातील कुणा सदस्याला उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा उच्च कोलेस्ट्रॉल असेल तर लहानपणापासूनच नियमित तपासणी करायला हवी. कौटुंबिक इतिहास आणि व्यक्तीच्या जीवनशैलीच्या आधारावर वर्षातून एकदा तपासणी व्हायला हवी. या सर्व आजारांवर नियमित औषधी घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. डॉ. अजीज खान, म्हणाले, हृदय रोगाच्या रुग्णामधील दर दहा व्यक्तीपैकी चार जण वयाच्या चाळिशीतील असतात. माणसाचे सरासरी वयोमान वाढले असले तरी आजारांचे वय कमी कमी होत आहे.
या दोन दिवसीय वार्षिक परिषदेत डॉ. सुरेंद्र देवरा, डॉ. प्रशांत अडवाणी, डॉ. चरण लांजेवार, डॉ. नितीन देशपांडे, डॉ. आशिष नाबर, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. पंकज राऊत, डॉ. निधीश मिश्रा, डॉ. जोनन क्रिस्टोफर, डॉ. बी. के. शास्त्री, डॉ. सजपाल अर्नेजा, डॉ. श्रीरंग गोडबोले, डॉ. माणिक चोप्रा, डॉ. महेश फुलवानी, डॉ. नागेश्वर वाघमारे, डॉ. हर्ष मेहता, डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. शंतनु देशपांडे, डॉ. पवन अग्रवाल व अन्य तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. परिषदेत अध्यक्षीय स्वागतपर भाषण डॉ. अनुज सारडा यांनी केले तर आभार सहसचिव डॉ. अच्युत खांडेकर यांनी मानले. परिषदेत ३०० हून अधिक हृदयरोग चिकित्सक सहभागी झाले होते.