नागपूर रेल्वेस्थानकावर घाण आणि दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:05 AM2019-02-27T11:05:14+5:302019-02-27T11:07:41+5:30
नागपूरचे रेल्वेस्टेशन वर्ल्ड क्लास बनविण्याचा प्रयत्न होत असताना, रेल्वे स्थानकाच्या बाहेर कचरा, घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. लोकमतच्या टीमने रेल्वेस्टेशन परिसराचा आढावा घेतला असता, प्रशासनाची उदासिनता दिसून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरचे रेल्वेस्टेशन वर्ल्ड क्लास बनविण्याचा प्रयत्न होत असताना, रेल्वे स्थानकाच्या बाहेर कचरा, घाण आणि दुर्गंधी पसरली आहे. लोकमतच्या टीमने रेल्वेस्टेशन परिसराचा आढावा घेतला असता, प्रशासनाची उदासिनता दिसून आली.
मुख्य द्वारासमोर पसरली आहे घाण
नागपुरात येणारे प्रवासी रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून बाहेर पडतात. मुख्यद्वारासमोरच प्रवाशांना घाण आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो. स्टेशन जवळील रस्त्यावर गटारीचे घाण पाणी वाहत आहे. प्रवाशांना पसरलेल्या गटाराच्या घाण पाण्यातून कसेबसे बाहेर पडावे लागत आहे.
आतमधील गटार सुद्धा तुंबली
लोकमतची टीम रेल्वे स्टेशन समोरील मुख्य द्वाराजवळील पार्किंगच्या परिसरात पोहचली. तिथे वाहनाच्या पार्किंग स्टॅण्डसमोरची गटार तुंबलेली आढळली. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन परिसरातील गणेश टेकडी रोडवरील गटार लाईन सुद्धा बऱ्याच ठिकाणी चोक झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर सतत घाण पाणी वाहत आहे. प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या अगदी समोर रेल्वेस्टेशन परिसरात १०० फुट उंच राष्ट्रध्वजाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते झाले. मात्र या परिसरातील अस्वच्छतेवर कुणाचेच लक्ष गेले नाही.
बगीच्याजवळ बनले शौचालय
रेल्वे स्टेशनच्या मुख्य परिसरातील गणेश टेकडी रोडला लागून असलेल्या खाली जागेवर रेल्वे प्रशासनाने सौंदर्यीकरण करून उद्यानाच्या रुपात विकसित केली आहे. येथे स्वच्छतेचे संदेशही दिले आहे. परंतु लोकांनी तिथे शौचालयच बनविले आहे. अशा लोकांवर कारवाईचा सुद्धा प्रयत्न केला जात नाही.
डस्टबिन गायब
स्वच्छ शहराचा दावा करणाऱ्या मनपा प्रशासनाने रेल्वे स्टेशनकडे दुर्लक्ष केल्याचे रेल्वे स्टेशन रोडवर पसरलेल्या घाणीवरून दिसून येते. रेल्वे स्टेशन परिसरात भिंतीला लागून डस्टबिन लावण्यात आल्या होत्या. परंतु त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे डस्टबिन गायब झाल्या असून, केवळ स्टॅण्ड उरले आहे. त्यामुळे रस्त्यावरच कचरा पसरलेला आहे.
दोन्ही यंत्रणेचे दुर्लक्ष
रेल्वे स्थानक परिसरात नियमित सफाईवर प्रशासनाचा जोर नसल्याचे दिसते आहे. आॅटोचालकाबरोबरच स्थानिक दुकानदारांनी सुद्धा तक्रारी केली की, सफाई कर्मचारी येथे नियमित सफाई करीत नाही. सूत्रांच्या मते रेल्वे स्टेशन परिसराच्या बाहेरील जबाबदारी मनपाची आहे. मात्र रेल्वे प्रवाशांना होत असलेल्या त्रासामुळे याची दखल रेल्वे प्रशासन सुद्धा घेऊ शकते. दोन्ही यंत्रणेचे दुर्लक्ष असल्यामुळे समस्या गंभीर होत चालली आहे.
नाक दाबूनच बाहेर पडावे लागते
रेल्वे स्थानकाचे पूर्वेकडील गेटवर सुद्धा घाण आणि कचºयाचे ढीग पसरले आहेत. तसेच प्लॅटफॉर्म नंबर ८ जवळील शौचालयाच्या भागात गटारीचे घाण पाणी साचले असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. प्रवाशांना बाहेर पडताना नाक दाबूनच निघावे लागत आहे.