नागपूरच्या धंतोली-रामदासपेठेतील वाहतूक कोंडी सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:54 PM2018-06-15T23:54:55+5:302018-06-15T23:57:04+5:30
धंतोली , रामदासपेठ येथील सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. परिसरातील नागरिकांनाही आता याचा मोठा त्रास होऊ लागला आहे. यावर महापालिकेने तोडगा काढत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रामदासपेठेतील नऊ एकर जागेवर वाहन तळ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. अटी व शर्तीसह पीकेव्हीनेही जागा देण्याची तयारी दर्शविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोली , रामदासपेठ येथील सर्वच प्रमुख रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. परिसरातील नागरिकांनाही आता याचा मोठा त्रास होऊ लागला आहे. यावर महापालिकेने तोडगा काढत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रामदासपेठेतील नऊ एकर जागेवर वाहन तळ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. अटी व शर्तीसह पीकेव्हीनेही जागा देण्याची तयारी दर्शविली आहे.
रामदासपेठ तसेच धंतोलीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णालये आहेत. या रुग्णालयात रुग्णाला भेटण्यासाठी येणाऱ्यांची वाहने, रुग्णांच्या नातेवाईकांची वाहने रस्त्यावर उभी केली जातात. याशिवाय रुग्णालयाच्या अॅम्ब्युलन्सची भर पडली आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी होत असून या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने यावर तोडगा काढण्यासाठी याच परिसरात वाहनतळ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रहाटे कॉलनी ते प्रस्तावित डीपी रोडपर्यंत जागेसंदर्भात पीकेव्हीशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले जाते. पीकेव्हीने यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे सुचविले आहे. महापालिकेने येथे पार्किंग प्लाझाचा प्रस्ताव मांडला. मात्र पीकेव्हीने त्यांच्या जागेवर पक्के बांधकाम न करण्याची अट घातली. त्यामुळे आता वाहनतळ तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी तब्बल ८०० चार चाकी आणि १६०० दुचाकी वाहने पार्क करता येतील. येथे उद्यानही तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.