डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:35 AM2017-07-31T00:35:03+5:302017-07-31T00:35:25+5:30

ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णाकडे डॉक्टरने दुर्लक्ष केल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला.

daokataracayaa-halagarajaipanaamaulae-rauganaacaa-martayauu | डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देकाटोलच्या ग्रामीण रुग्णालयात तणाव : दोषी डॉक्टरवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
काटोल : ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णाकडे डॉक्टरने दुर्लक्ष केल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्ण दगावल्याचे ध्यानात येताच डॉक्टरने दवाखान्यातून पळ काढल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास काटोल ग्रामीण रुग्णालयात घडली. दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभाराविरुद्ध संतप्त नागरिकांनी जोरदार नारेबाजी करीत संताप व्यक्त केला. यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पांडुरंग संभाजी मोहिजे (५०, रा. पेठ बुधवार, काटोल) असे मृताचे नाव आहे. सविस्तर असे की, पांडुरंग मोहिजे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांची पत्नी व शेजाºयांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात पहाटे ३ वाजताच्या सुमारास दाखल केले. तेथे कर्तव्यावर असलेल्या डॉ. प्रशांत मेश्राम यांनी रुग्णाला दोन इंजेक्शन लावून घरी पाठविले. दरम्यान त्यांची पुन्हा प्रकृती बिघडल्याने सकाळी ६ वाजता रुग्णालयात आणण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ असल्याचे पाहून शेजारी सुमन बुचुनडे या दोन वेळा डॉक्टरला बोलाविण्याकरिता त्यांच्या विश्राम कक्षाकडे गेल्या. परंतु डॉक्टरने दार उघडले नाही व रुग्णाला पाहायलादेखील आले नाही.
रुग्णाची नाजूक अवस्था पाहता नर्सने डॉक्टरला बोलावले. दरम्यान रुग्ण दगावल्याचे डॉक्टरच्या लक्षात येताच डॉक्टरने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दवाखान्यात पोहचलेल्या नगरसेवक संदीप वंजारी यांनी डॉक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु हे प्रकरण अंगलट येणार म्हणून डॉक्टर तेथून पसार झाला. या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली. आ. डॉ. आशिष देशमुख, माजी मंत्री अनिल देशमुख, आयुश्री देशमुख, सलील देशमुख, चरणसिंग ठाकूर, जितेंद्र तुपकर, किशोर गाढवे, हेमराज रेवतकर, देवीदास कठाणे, अनिल डफर, सोपान हजारे, विजय महाजन आदी दवाखान्यात पोहोचले. आ. आशिष देशमुख यांनी घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करून राज्याचे आरोग्य मंत्री दिलीप सावंत यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. तसेच जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी डॉक्टरची न्यायालयीन चौकशी करण्याचे सांगितले. रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्टरविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. अनिल देशमुख यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराची माहिती देऊन प्रभारी अधीक्षक शकील अहमद आणि इतर वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहात नाही. आज एवढी घटना घडल्यानंतर फोन करूनदेखील ते रुग्णालयात पोहोचले नाही, असे सांगितले.

मृतदेह उचलण्यास नागरिकांचा नकार
संतप्त झालेल्या नागरिकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांनी येऊन दोषी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. त्याशिवाय रुग्णालयातून मृतदेह उचलू देणार नाही, डॉक्टरवर कारवाई न झाल्यास दवाखाना पेटवून देऊ, अशी नारेबाजी सुरू केली. दरम्यान, संतप्त जमाव पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक दिगांबर चव्हाण यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. डॉ. प्रशांत मेश्राम यांच्याविरुद्ध मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

या प्रकरणाला घेऊन चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. २४ तासांच्या आत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. तूर्तास डॉ. प्रशांत मेश्राम यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. समितीचा अहवालात डॉ. मेश्राम दोषी आढळून आल्यास व नोटीसचे उत्तर समाधानकारक नसल्यास निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या संचालकांकडे पाठविला जाईल. सध्या डा. मेश्राम यांची तातडीने रामटेक येथे बदली करण्यात आली आहे.
- डॉ. संजय जयस्वाल
उपसंचालक, आरोग्य विभाग

Web Title: daokataracayaa-halagarajaipanaamaulae-rauganaacaa-martayauu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.