दपूम रेल्वेचे रेल्वेगाड्यात तपासणी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:08 AM2021-06-16T04:08:55+5:302021-06-16T04:08:55+5:30
नागपूर : रेल्वे प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यात २ ते ११ जूनदरम्यान १० दिवसाचे तपासणी अभियान राबविले. कोरोनाचा ...
नागपूर : रेल्वे प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यात २ ते ११ जूनदरम्यान १० दिवसाचे तपासणी अभियान राबविले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यातील पेंट्रीकारमध्ये भोजन तयार करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे प्रवाशांना केवळ पाकिटबंद भोजन उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. अभियानात रेल्वेच्या वाणिज्य विभागाचे अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी विभागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यातील पेंट्रीकारमध्ये भोजन तयार करण्यात येत आहे काय? तसेच पाकिटबंद भोजन उपलब्ध आहे की नाही, याची खात्री केली. तसेच पेंट्रीकारमध्ये पाकिटबंद भोजनाची स्वच्छता, पेंट्रीकारमधील कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, ओळखपत्र, सफाईची व्यवस्था आदींचे निरीक्षण केले. सोबतच अग्निशमन यंत्र आहे की नाही तसेच त्याची वैधता तपासण्यात आली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक विकास कुमार कश्यप यांच्या नेतृत्वात सहायक वाणिज्य व्यवस्थापक जितेंद्र तिवारी, अविनाश कुमार आनंद, तिकीट निरीक्षकांच्या सहकार्याने विभागातून धावणाऱ्या रेल्वेगाड्या तसेच प्रमुख रेल्वेस्थानकात तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. त्यानुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्या तसेच सामानाची बुकिंग न करणाऱ्या १५४४ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ७ लाख ७९ हजार ९७५ रुपये दंड वसूल केला. तसेच कचरा पसरविणाऱ्या ४३ प्रवाशांकडून १९,१०० रुपये आणि धूम्रपान करणाऱ्या ११ प्रवाशांकडून २,२०० रुपये दंड वसूल केला. ‘डीआरएम’ मनिंदर उप्पल यांनी रेल्वे प्रवाशांना रेल्वे नियमाचे पालन करून विना तिकीट प्रवास न करण्याचे आवाहन केले.
...........