-अन् दप्तराचे ओझे हलके झाले !

By admin | Published: September 23, 2016 02:54 AM2016-09-23T02:54:17+5:302016-09-23T02:54:17+5:30

लाखालाखांचे प्रवेश शुल्क घेऊनही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकांचे ओझे तसेच कायम ठेवणाऱ्या अनेक पंचतारांकित शाळेसमोर राष्ट्रसेवा विद्यालयाने एक विधायक आदर्श उभा केला आहे.

-Daptara's burden was light! | -अन् दप्तराचे ओझे हलके झाले !

-अन् दप्तराचे ओझे हलके झाले !

Next

राष्ट्रसेवा विद्यालयाचा प्रेरणादायी उपक्रम : शासनाचे दप्तरमुक्त अभियान १०० टक्के यशस्वी
मंगेश व्यवहारे नागपूर
लाखालाखांचे प्रवेश शुल्क घेऊनही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकांचे ओझे तसेच कायम ठेवणाऱ्या अनेक पंचतारांकित शाळेसमोर राष्ट्रसेवा विद्यालयाने एक विधायक आदर्श उभा केला आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने जे दप्तरमुक्त अभियान राबविले होते. त्या अभियानाला या शाळेतील शिक्षकवृंदांनी आपल्या विशेष प्रयत्नांनी शंभर टक्के यशस्वी केले आहे.

या अभियानाला सुरुवातीला अनेक शाळांकडून प्रतिसादच मिळाला नाही. काही शाळांनी तर शासनाचा हा उपक्रमच चुकीचा असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर शिक्षण विभागाचे अधिकारीही हा प्रकार थोतांड असल्याची बतावणी करू लागले. त्यामुळे हे अभियानच फेल पडले. परंतु नागपुरातील लालगंज परिसरातील राष्ट्रसेवा विद्यालयाने शासनाचा हा उपक्रम अतिशय यशस्वीपणे राबवून, विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील ओझे कमी केले. या शाळेचे हे प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहेत.
आज पहिल्या वर्गापासूनच शिक्षण व्यापक झाले आहे. पाटी आणि लेखन हा प्रकार मुळातच बंद झाला आहे. त्याची जागा जाड-जाड वह्या व पुस्तकांनी घेतली आहे. त्यामुळे पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन तीन किलोच्या वर भरते. तर दप्तरमुक्त अभियानात पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन तीन किलोच्या वर नसावे असा शासन निर्णय आहे. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात हे अभियान शासनाने जोरकसपणे राबविले. शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख हातात काटे घेऊन मुलांच्या दप्तराचे वजन करण्यासाठी शाळोशाळी फिरू लागले. प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वजनाच्या नोंदी ठेवण्यात येऊ लागल्या. परंतु दप्तराचे वजन काही कमी झाले नाही. काही शाळांनी तर दप्तराचे ओझे कमी करू शकत नसल्यामुळे अधिकाऱ्यांपुढे हातच टेकले. अशा अवस्थेत राष्ट्रसेवा विद्यालयाच्या शिक्षकांनी कल्पकता वापरून हा उपक्रम यशस्वी करून दाखविण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी पालकांच्या बैठका घेऊन अभियानाची माहिती दिली. त्यानंतर वेळापत्रक आखले. प्रत्येक दोन विषयांना त्यांनी एक दिवस दिला.

पालकांकडूनही प्रतिसाद
नागपूर : सुरुवातीला विद्यार्थ्यांना दप्तराविना शाळेत जाणे काहीसे अवघडल्यासारखे वाटू लागले. हळूहळू त्यांना सवय जडली. पाचव्या वर्गाला सहा विषयाचे पुस्तके व तेवढ्याच वह्या लागतात. सोबत दोन स्वाध्यायमाला असतात. जवळपास १४ पुस्तक दप्तरात घेऊन यावे लागत होते. आता विद्यार्थी शाळेत येताना कॅरीबॅग अथवा पिशवीत दोन वह्या व दोन पुस्तके घेऊन येतात, आणि तेवढेच पुस्तके घेऊन जातात. या सत्राची शाळा सुरू झाल्यापासून अतिशय यशस्वीपणे हा उपक्रम सुरू असून त्यात कुठलीही अडचण आलेली नाही. पालकांकडूनही आता चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
नागपुरात लाखो रुपये फी वसूल करून मुलांना शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तारांकित सोईसवलती दिल्या जातात. त्यामुळे या शाळा सदैव प्रसिद्धीत असतात.
अशा वातावरणात लालगंज भागातील राष्ट्रसेवा विद्यालय कुठलाही गाजावाजा न करता शासनाचा एखादा उपक्रम यशस्वी करते, तेव्हा इतर शाळांपुढे त्यांची कल्पकता प्रेरणादायी ठरते. (प्रतिनिधी)

Web Title: -Daptara's burden was light!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.