‘दरिद्र भोज’साठी ‘दरिद्र नारायण’ व्हावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:08 AM2020-12-29T04:08:38+5:302020-12-29T04:08:38+5:30

विशाल महाकाळकर / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : माणसाने अन्यान्न तंत्र विकसित करत अनेक गोष्टींवर मात केली आणि स्वत:ला ...

For ‘Daridra Bhoj’ one has to be ‘Daridra Narayan’ | ‘दरिद्र भोज’साठी ‘दरिद्र नारायण’ व्हावे लागेल

‘दरिद्र भोज’साठी ‘दरिद्र नारायण’ व्हावे लागेल

Next

विशाल महाकाळकर / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : माणसाने अन्यान्न तंत्र विकसित करत अनेक गोष्टींवर मात केली आणि स्वत:ला सुखवस्तू केले आहे. मात्र, भुकेवर तो मात करू शकला नाही. कारण, भूकच अशी एक संवेदना आहे जी माणसाचे माणूसपण जपते. व्यक्तिपरत्त्वे भुकेचे प्रकार वेगळे असले तरी पोटाची भूक ही सारखीच आहे. कुणी दही, श्रीखंड खात असेल आणि कुणाच्या नशिबात फेकलेला भाकरीचा तुकडाच असेल. भूक मिटली की ना दह्या, श्रीखंडाचे महत्त्व ना फेकलेल्या भाकरीच्या तुकड्याचे. हाच भाव जपत जमसेदसिंग कपूर दररोज लंगर सेवा प्रसादाद्वारे भुकेल्यांचे पोट भरत आहेत.

इसवी सन १५१२ मध्ये गुरुनानक देव प्रवासात नागपुरातून पुढे गेले होते. त्यावेळी त्यांनी येथे लंगरचा प्रसार केला होता. हंगर रिपोर्टनुसार जगात दररोज १०० कोटी लोक उपाशी झोपतात. तोच धागा पकडत जमसेदसिंग लंगर सेवा प्रकल्प चालवत आहेत. जमसेदसिंग नावाजलेले ज्योतिषी आहेत आणि प्रवचनकारही आहेत. ३०-३१ जानेवारी २०१३च्या मध्यरात्री महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त व्हेरायटी चौक येथे शांती प्रवचन त्यांनी केले होते. तेथूनच त्यांच्यासोबतच असलेल्यांनी सेवक समाजाची स्थापना केली आणि त्याच रात्रीपासून लंगर सेवेस प्रारंभ झाला. तेव्हापासून संस्थेचे सदस्य दररोज वेगवेगळ्या स्थळांवर आपापल्या वेळेनुसार भुकेल्यांना अन्न पुरविण्याचे कार्य करत आहेत. जमसेदसिंग स्वत: दररोज ३५० ते ४०० गरजूंची भूक भागवत असतात. भेदभावाशिवाय हा लंगर प्रसाद ते वितरित करत असतात. हे दरिद्र भोज आहे आणि या भोजचा लाभ घेण्यासाठी तुम्हालाही दरिद्री नारायण व्हावे लागेल, असे ते म्हणतात. या कामात सुधीर सोनटक्के, विजय बारापात्रे, अनिल मार्कण्डे, आशा मार्कण्डे, उषा अग्रवाल, अर्चना तेलंग, ॲड. मनोज बढिये हे कार्यकर्ते सहकार्य करत असतात.

* पूजापाठ, राशीरत्न हे तुमचे भाग्य घडवत नाहीत तर भुकेल्यांमध्ये ईश्वर शोधल्यास तुमचे भाग्य बदलते. ईश्वराचा वास गरिबांमध्ये आहे आणि त्याचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडे जावे लागेल.

- जमसेदसिंग कपूर

* १ रुपयात पोटभर जेवण

आम्ही सध्या ही सेवा फिरून करतो आहोत. पुढे १ रुपयात पोटभर जेवण देण्याचा उपक्रम सुरू करण्याच्या तयारीत आहोत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जागेसाठी निवेदनही दिले आहे. या १ रुपयात गरीबच नव्हे तर श्रीमंतही अडीअडचणीत भूक भागवू शकतो. या सेवेत सहभाग देणारे समाजातील ईश्वर असल्याचे कपूर यांनी सांगितले.

......

Web Title: For ‘Daridra Bhoj’ one has to be ‘Daridra Narayan’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.