काळे ढग, अनुकूल वातावरण, तरीही पावसाला जाेर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2023 09:03 PM2023-07-08T21:03:44+5:302023-07-08T21:04:10+5:30

Nagpur News नागपुरात शनिवारीही सकाळपासून दिवसभर आकाशात काळे ढग जमा झाले हाेते. पण हलक्या रिमझिमशिवाय काहीच झाले नाही. या स्थितीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही चिंता वाढणार आहे.

Dark clouds, favorable weather, yet not prone to rain | काळे ढग, अनुकूल वातावरण, तरीही पावसाला जाेर नाही

काळे ढग, अनुकूल वातावरण, तरीही पावसाला जाेर नाही

googlenewsNext

नागपूर : आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पावसासाठी अनुकूल असे आर्द्रतायुक्त वातावरण असूनही अपेक्षेप्रमाणे मुसळधार पावसाने अद्यापही हजेरी लावली नाही. नागपुरात शनिवारीही सकाळपासून दिवसभर आकाशात काळे ढग जमा झाले हाेते. पण हलक्या रिमझिमशिवाय काहीच झाले नाही. या स्थितीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही चिंता वाढणार आहे.

यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून सातत्याने पावसाच्या लहरीपणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. जुलैचा दुसरा आठवडा सुरू झाल्यानंतरही या महिन्याला साजेसा पाऊस अद्याप पडलाच नाही. शनिवारीही तीच अवस्था हाेती. शुक्रवारी रात्री विदर्भात ब्रम्हपुरी ३४ मि.मी., चंद्रपूर २७.८ मि.मी., गाेंदिया २२.४ मि.मी. व यवतमाळात २२.२ मि.मी. एवढी हजेरी लावली. नागपुरात केवळ ७.६ मि.मी. पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात केवळ ५२.७ मि.मी. अशा चांगल्या पावसाची नाेंद झाली. मात्र शनिवारी पुन्हा हुलकावणी दिली. सकाळपासून आकाश काळ्या ढगांनी व्यापले हाेते व हलकी रिमझिमही सुरू झाली हाेती. मात्र, हळूहळू जाेर ओसरून पाऊस बंद झाला. सायंकाळपासूनही अशीच रिमझिम हाेत किरकाेळ हजेरी लावली. गाेंदिया ११ मि.मी. वगळता कुठेही माेजण्याइतकाही पाऊस झाला नाही. केवळ पारा कमी हाेऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.

विशेष म्हणजे हवामान खात्याने २ ते ८ जुलैपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला हाेता. मात्र, यवतमाळमध्ये एका रात्री झालेल्या १४६ मि.मी. पावसाव्यतिरिक्त कुठेही पुरेसा पाऊस झाला नाही. भंडारा व गाेंदियात जुलैच्या सुरुवातीला धुवांधार पाऊस झाल्याने येथील तुट भरून निघाली आहे. या जिल्ह्यातही काही तालुके काेरडेच आहेत. नागपूरसह इतर सर्व जिल्ह्यात पावसाची तूट ३० ते ५५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

यात आणखी चिंताजनक म्हणजे रविवारपासून विदर्भात तुरळक ठिकाणी किरकाेळ पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमाेर शेतीचे व दुबार पेरणीचे संकट आणि शहरातील नागरिकांसमाेर पाणीटंचाईचे संकट निर्माण हाेण्याची धाेकादायक शक्यताच निर्माण झाली आहे.

सध्या जाेरदार पावसासाठी सर्व प्रणाल्या अनुकूल आहेत. मात्र, काेकण व घाट वगळता कुठेही पावसाला जाेर नाही. १२ जुलैपर्यंत पावसाची तीव्रता अजून कमी हाेण्याची शक्यता आहे. १५ जुलैनंतर पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाने तूट भरून निघणार असेल तरीही पावसाची असमान विसंगती खरिपातील शेतपीक नियोजनास कुचकामी व धोकादायक ठरू शकते. हा ‘एल-निनाे’ चा प्रभाव आणि आयओडी असक्रिय असण्याचे कारणच म्हणावे लागेल. वातावरणाची ही जटिलता वैज्ञानिकांसाठी आव्हान आहे.

- माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी

Web Title: Dark clouds, favorable weather, yet not prone to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस