आकाशात दाटले ढग, सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:26 AM2020-12-13T04:26:08+5:302020-12-13T04:26:08+5:30
नागपूर : उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्वेकडील हवा आपसात धडकल्यानंतर तयार झालेल्या विशेष क्षेत्रामुळे मध्य भारतात हवामानात बदल झाला आहे. ...
नागपूर : उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्वेकडील हवा आपसात धडकल्यानंतर तयार झालेल्या विशेष क्षेत्रामुळे मध्य भारतात हवामानात बदल झाला आहे. याच कारणाने शनिवारी नागपुरात दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
पुढील चार ते पाच दिवस असेच हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ढगाळ वातावरणामुळे नागपुरात रात्री तापमान ३.४ डिग्रीने वाढून १८.८ डिग्री सेल्सिअसवर गेले होते. किमान तापमान सामान्यापेक्षा ६ डिग्रीने अधिक असल्याने रात्री थंडीचा परिणाम कमी होता.
हवामान खात्यानुसार पश्चिम भागात बदल झाल्याने तयार झालेल्या सायक्लोनचा परिणाम पाकिस्तानसह पंजाबच्या बहुतांश भागात झाला आहे. यामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. मध्यभारतात आकाशात वेगवेगळ्या दिशेने वाहणारी हवा आपसात धडकल्याने विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यात पाऊस येण्याचा आणि हवा वेगाने वाहण्याची शक्यता आहे. चार ते पाच दिवस नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश भागात आकाशात ढग राहतील. शिवाय हलका पाऊस पडू शकतो. या कारणाने रात्री तापमान कमी होण्याची शक्यता कमी आहे. दिवसा तापमानात दोन डिग्रीपर्यंत घसरण होऊ शकते.
नागपुरात शनिवारी सकाळी ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान १.४ डिग्रीने कमी होऊन ३० डिग्री सेल्सिअसवर आले. सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ६५ टक्के कमी होती, तर सायंकाळी ५.३० वाजता आणखी कमी होऊन ५४ टक्क्यांवर पोहोचली. विदर्भात १४.६ डिग्रीसह चंद्रपूर सर्वाधिक थंड होते. विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये रात्री तापमानात वाढ झाली, तर दिवसा थोडी घसरणीची नोंद झाली आहे.