अंधारलेल्या जीवनात प्रकाश पणती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 03:57 PM2018-06-09T15:57:29+5:302018-06-09T15:58:03+5:30
नियतीची अवकृपा एखाद्यावर इतकी होते की, की त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. आरतीवर सुद्धा नियतीची अशीच अवकृपा झाली. जन्मताच तिने दृष्टी गमावली आणि वयाच्या चौथ्या वर्षी तिने आई-वडिलांचे छत्र हरविले. पण कुठेतरी रक्ताच्या नात्यात ओलावा शिल्लक होता, त्यामुळे मामाने आरतीला आधार दिला अन् तिच्या हरविलेल्या आयुष्याला एक वळण मिळाले. आज दहावीचा निकाल लागला. यात आरतीने मिळविलेले यश हे तिने आपल्या अंधारलेल्या जीवनात पेरलेली प्रकाशाची पणतीच होय.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नियतीची अवकृपा एखाद्यावर इतकी होते की, की त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. आरतीवर सुद्धा नियतीची अशीच अवकृपा झाली. जन्मताच तिने दृष्टी गमावली आणि वयाच्या चौथ्या वर्षी तिने आई-वडिलांचे छत्र हरविले. पण कुठेतरी रक्ताच्या नात्यात ओलावा शिल्लक होता, त्यामुळे मामाने आरतीला आधार दिला अन् तिच्या हरविलेल्या आयुष्याला एक वळण मिळाले. आज दहावीचा निकाल लागला. यात आरतीने मिळविलेले यश हे तिने आपल्या अंधारलेल्या जीवनात पेरलेली प्रकाशाची पणतीच होय.
आरती मानमोडे मूळची वर्धा जिल्ह्यातील मोहदापूरची. अपघातात आई-वडिलांचे छत्र हरविल्याने मामाच्या आधाराने ती नागपुरात आली. अंध विद्यालयाच्या श्रद्धानंदपेठ येथील वसतिगृहातून तिने शिक्षणाला सुरुवात केली. श्रद्धानंदपेठेतील कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूल येथून तिने दहावीची परीक्षा दिली. आरती मुळात हुशारच. सोबत मेहनती आणि जिद्दी. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे तिला प्रगतीची पाऊलवाट सापडली. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, ही खूणगाठ तिने मनाशी बांधली. आपले अपंगत्व, शिक्षणात येणाऱ्या अडचणी या सर्वांवर तिने मात केली. शाळेच्या विद्या बचाले या शिक्षिकेचे मिळालेले मार्गदर्शन आणि वसतिगृहात अभ्यासासाठी उपलब्ध झालेले वातावरण, मामा जगदीश चोपडे यांचा पाठीवर असलेला हात त्यामुळे आरतीचा यशाचा मार्ग सुकर झाला.
जन्मत:च अंध त्यातच आईवडिलांचे छत्र बालपणीच हरवलेले. अंध असतानाही मामाने दिलेला आपुलकीचा हात आणि गुरुजनांनी दाखविलेला जगण्याचा मार्ग, त्यामुळेच हा आनंद आज मी अनुभवत आहे.