अंधांच्या प्रवासातील दीपस्तंभ !
By Admin | Published: September 5, 2015 03:14 AM2015-09-05T03:14:24+5:302015-09-05T03:14:24+5:30
वर्तमानात शिक्षक आणि शिक्षणाची संकल्पनाच बदलली आहे. शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण झाले आहे.
मंगेश व्यवहारे नागपूर
वर्तमानात शिक्षक आणि शिक्षणाची संकल्पनाच बदलली आहे. शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण झाले आहे. शिक्षकी पेशाला केवळ अर्थार्जनाचे माध्यम म्हणून बघितले जात आहे. अशा परिस्थितीत देवराव मेश्राम सरांच्या शिक्षणातील समर्पणाने शिक्षणक्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी दृष्टिहीन मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना आपल्या पायावर उभे केले आहे. गेल्या ३५ वर्षापासून ते ‘सरस्वती’ची सेवा करीत आहे.
भंडारा जिल्ह्यातील सावरगाव या लहानशा गावात देवराव मेश्राम यांचा जन्म झाला. जन्मत:च त्यांच्या नशिबी अंधत्व आले. वडील शेतकरी, त्यावेळी घरची परिस्थिती अत्यंत बिकट. मुलगा अंध जन्माला आल्याने, आई-वडील नशिबालाच दोष देत होते. मुलाचे काय होईल, ही चिंता त्यांना सतत भेडसावत होती. मात्र गावातील कुथे नावाच्या शिक्षकाने देवराव मेश्राम यांना सामान्यांच्या शाळेत प्रवेश दिला. त्यांची गुणवत्ता शिक्षकाच्या लक्षात आल्याने, त्यांनी भंडाऱ्यातील अंध शाळेत दाखल केले. तिथे ब्रेलमध्ये त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले. पुढचे शिक्षण त्यांनी सामान्य मुलांच्या शाळेत घेतले. परिस्थिती नसल्यामुळे ४ किलोमीटर दररोज पायी शाळेत जाऊन, दहावीत अंध विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता यादीत ते आले. पुढे त्यांनी एमए पर्यंतचे शिक्षण नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये घेतले. १९८० मध्ये द ब्लाईंड रिलीफ असोसिएशन नागपूरद्वारा संचालित अंध विद्यालयात विशेष शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
मध्य भारतातील अंध विद्यार्थ्यांची ही संस्था आहे. या संस्थेत त्यांनी अंध विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य सुरू केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणीबरोबर, त्यांचे कौटुंबिक प्रश्न सोडविण्याचे त्यांनी प्रयत्न केले. ग्रामीण भागातील अंध विद्यार्थ्यांना निवासाची व्यवस्था उपलब्ध करून दिली. निव्वळ शिक्षणच नाही, तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या कर्मशाळेत विविध कामाचे प्रशिक्षण दिले. ग्रामीण भागातील अंध विद्यार्थ्यांना छोटेमोठे उद्योग लावून देऊन, त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. अंध मुलींचे विवाह करून दिले.