दर १० मिनिटांनी अंधार अन् उजेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:06 AM2021-07-04T04:06:43+5:302021-07-04T04:06:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क टाकळघाट : दीड महिन्यापासून विजेचा लपंडाव टाकळघाटवासीयांच्या पाचवीला पूजला आहे. दर १० मिनिटांनी वीजपुरवठा खंडित व ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
टाकळघाट : दीड महिन्यापासून विजेचा लपंडाव टाकळघाटवासीयांच्या पाचवीला पूजला आहे. दर १० मिनिटांनी वीजपुरवठा खंडित व सुरळीत हाेत असून, हा प्रकार २४ तास सुरू असताे. एकीकडे वारंवार तक्रारी करूनही महावितरण कंपनी ही समस्या साेडवायला तयार नाही तर, दुसरीकडे उकाड्यामुळे लहान मुलांची झाेपमाेड हाेत असल्याने पुरेशा झाेपेअभावी त्यांची चिडचिड वाढली असून, विजेची उपकरणे खराब हाेण्याची शक्यता बळावली आहे.
औद्याेगिक वसाहतीमुळे टाकळघाट (ता. हिंगणा) व परिसरातील लाेकसंख्येची घनता अधिक आहे. टाकळघाटची लाेकसंख्या २० हजाराच्या वर आहे. काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने वातावरणातील दमटपणा वाढला आहे. त्यातच दीड महिन्यापासून टाकळघाट येथील वीजपुरवठा सतत खंडित व पूर्ववत असल्याने छाेट्या मुलांसह विद्यार्थी, नागरिक, कामगार व उद्याेजक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
ही समस्या सांगण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना फाेन केला असता, ते प्रतिसाद देत नाही. प्रतिसाद दिला तर असंबद्ध उत्तरे देतात, असेही नागरिकांनी सांगितले. परिणामी, या समस्येची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करावी तसेच वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी किशोर गंधारे, ललित कावळे, अमोल माथूरकर, विनायक कावळे, प्रवीण सूर्यवंशी, मयूर बघेल यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
...
बँका व उद्याेगधंदे ठप्प
वारंवार वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने टाकळघाट येथील प्राथमिक आराेग्य केंद्रातील रुग्णांचे हाल हाेत असून, संगणक प्रशिक्षण केंद्र, शिकवणी वर्ग, शासकीय सेतू केंद्र, बँका व इतर व्यावसायिक केंद्रातील कामे ठप्प झाली आहेत. बेराेजगार तरुणांना नाेकरीसाठी तसेच शेतकऱ्यांना शासकीय याेजनांचा लाभ घेण्यासाठी विजेअभावी ऑनलाईन अर्जही भरणे शक्य हाेत नाही. आधारकार्ड तयार करण्यासाठी तसेच बँकांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी नानाविध अडचणी येत आहेत. विजेअभावी एटीएमचीही वाईट अवस्था आहे.
..
मुलांचे आराेग्य धाेक्यात
दमट वातावरणामुळे उकाडा वाढला असून, त्याला ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना खूप त्रास हाेत आहे. उकाडा व डासांच्या त्रासामुळे मुले रात्रभर तसेच दिवसा व्यवस्थित व शांत झाेपत नाही. त्यामुळे त्यांची चिडचिड वाढली असून, झाेपेअभावी त्यांचे आराेग्यास धाेका उद्भवण्याची तसेच मुलांना मलेरिया व तत्सम आजार बळावण्याची शक्यता डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे. सततच्या लपंडावामुळे घरातील विजेची विविध उपकरणे निकामी हाेण्याची व आर्थिक नुकसान हाेण्याची शक्यता बळावली आहे.
...
इंडोरामा कंपनीच्या मागील बाजूस केबल शॉर्ट असल्यामुळे तसेच केबलमधील फाॅल्ट मिळत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपसून सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. केबलमधील फाॅल्ट शाेधण्याचे काम सुरू आहे. त्यात दुरुस्ती करून लवकर वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.
- शंकर बनकर, सहायक अभियंता,
महावितरण कंपनी, टाकळघाट.