दुपारी पसरला अंधार, बरसल्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:07 AM2021-09-13T04:07:56+5:302021-09-13T04:07:56+5:30
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते ओडिशापर्यंत पाेहचले आहे. दाेन-तीन दिवसांत हा दबाव ...
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते ओडिशापर्यंत पाेहचले आहे. दाेन-तीन दिवसांत हा दबाव ओडिसा ते छत्तीसगडकडे वळणार आहे. यामुळे मध्य भारतात आकाशात बदल झालेला दिसताे.
नागपुरात सप्टेंबर महिन्यात माॅन्सूनची मेहरबानी हाेत आहे. कृषी विभागाच्या आकड्यानुसार सप्टेंबरच्या १२ दिवसांत २३०.८ मिमी पाऊस नाेंदविण्यात आला आहे. सामान्यपणे या महिन्यात ७६.४ मिमी पाऊस हाेत असताे. मात्र यावर्षी सप्टेंबर महिना दिलासादायक ठरला. चांगल्या पावसामुळे आधीची तूट भरून निघत असून तलाव व जलाशयात पाणी साठले आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यातील तुटीमुळे तलाव व धरणांमध्ये क्षमतेप्रमाणे पाणी साठले नव्हते. परतीच्या पावसाने ही तूट भरून निघेल, अशी अपेक्षा आहे. नागपुरात रविवारी दुपारपर्यंत ऊन पडले हाेते. दुपारी १२ नंतर वातावरणात बदल हाेत गेला. दुपारी ३ वाजता ढगांची गर्दी वाढली आणि पावसाला सुरुवात झाली. वातावरणातील आर्द्रता सकाळी ९२ टक्के हाेती पण सायंकाळी ९८ टक्क्यांवर पाेहचली.