उमरेड तालुक्यातील २५ गावात पथदिव्याखाली अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:13 AM2021-08-28T04:13:03+5:302021-08-28T04:13:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : पथदिव्यांची वीज बिल रक्कम थकीत असल्याच्या कारणावरून विद्युत विभागाने तालुक्यातील २५ पेक्षा अधिक गावांची ...

Darkness under street lights in 25 villages of Umred taluka | उमरेड तालुक्यातील २५ गावात पथदिव्याखाली अंधार

उमरेड तालुक्यातील २५ गावात पथदिव्याखाली अंधार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : पथदिव्यांची वीज बिल रक्कम थकीत असल्याच्या कारणावरून विद्युत विभागाने तालुक्यातील २५ पेक्षा अधिक गावांची बत्ती गुल केली. गावातील पथदिवेच बंद पडल्याने सुमारे २५ गावांमध्ये आता ‘पथदिव्याखाली अंधार’ पसरला आहे. या कारणावरून शुक्रवारी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी विद्युत कार्यालय गाठत भावना व्यक्त केल्या. आम्ही लोकप्रतिनिधींकडे अनेकदा गावकऱ्यांची समस्या मांडली; परंतु या समस्येला केराची टोपली दाखविण्यात आली, असाही आरोप यावेळी केला गेला.

सध्या सर्वत्र चोरीच्या घटना घडत आहेत. थकीत बिलाचा भरणा करण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून निधी मंजूर करावा, अशी विनंती केली आहे तेव्हा ग्रामपंचायतींना महिनाभराची मुदत द्या, अशी मागणी यावेळी सरपंचांनी केली. आधी वीज बिल भरा मगच वीज सुरू होईल, असे उत्तर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी हजारो लोकांना मुद्दाम वेठीस धरले जात असल्याचा आरोप सरपंच संघटनेचे अध्यक्ष अश्विन उके यांनी केला.

कोरोनामुळे अनेकांनी कराचा भरणा केला नाही. ग्रामपंचायत स्वनिधीच्या माध्यमातून ही रक्कम भरल्यास ‘कर’ स्वरूपात गावकऱ्यावर भुर्दंड बसेल, अशीही बाजू यावेळी मांडण्यात आली. कलांद्री बोरगाव, चांपा, दहेगाव, सेव, आंबोली, पिराया, मटकाझरी, पाचगाव, गोधनी, विरली, गावसूत, चनोडा, नांदरा, चिखलधोकडा, मसाळा, बारव्हा, सावंगी खुर्द, बेलपेठ, बोरीमजरा, आमघाट, पेंडकापार, वडगाव, किन्हाळा आदी गावांमधील पथदिव्याची वीज कापल्या गेल्याने गावकरी चांगलेच संतापले आहेत. ही समस्या न सुटल्यास तालुका, जिल्हा स्तरावर आंदोलन करू, असा इशारा सरपंच, सदस्य आणि गावकऱ्यांनी दिला आहे. याप्रसंगी अश्विन उके, शिवदास कुकडकर, अनिल दांडेकर, विलास दरणे, राजकुमार राऊत, महेश मरगडे, मधुकर सातपुते, राजेश हजारे, माया धोपटे, कृष्णा पन्नासे, जीजाबाई छापेकर, रेखा गजघाटे, योगीता मानकर आदींची उपस्थिती होती. विद्युत विभागाशी संपर्क साधला असता, सुमारे २५ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती मिळाली.

-----

आराखडा मंजूर करा

पथदिव्याचे बिल पंधराव्या वित्त आयोगातून भरा, असे आदेश आहेत. असे असले तरी जोपर्यंत आराखडा मंजूर केला जात नाही, तोपर्यंत ही रक्कम वळती होऊ शकत नाही. यामुळे दोन आठवड्यांपूर्वी उमरेड तालुक्यातील सरपंचांनी आराखडा मंजूर करण्याबाबतचे निवेदन पंचायत समितीकडे सोपविले आहे.

Web Title: Darkness under street lights in 25 villages of Umred taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.