वाघ वाचविण्यासाठी दास दाम्पत्याचे भारतभ्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:14 PM2019-07-27T23:14:10+5:302019-07-27T23:15:58+5:30
वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे वाघ वाचविण्याचा संदेश देण्यासाठी सॉल्टलेक कोलकाता येथील दास दाम्पत्य दुचाकीवर भारतभ्रमण करीत आहे. ‘जर्नी फॉर टायगर’ या अभियानानुसार २१ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून शनिवारी ते नागपुरात पोहोचले. वाघांचे संरक्षण करणे काळाची गरज असून, त्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे वाघ वाचविण्याचा संदेश देण्यासाठी सॉल्टलेक कोलकाता येथील दास दाम्पत्य दुचाकीवर भारतभ्रमण करीत आहे. ‘जर्नी फॉर टायगर’ या अभियानानुसार २१ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून शनिवारी ते नागपुरात पोहोचले. वाघांचे संरक्षण करणे काळाची गरज असून, त्यासाठी प्रत्येक भारतीयाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
रथीन्द्रोनाथ दास (४३) आणि त्यांची पत्नी गीतांजली दास हे दोघेही १५ फेब्रुवारीला सॉल्टलेक कोलकाता येथून भारत भ्रमणासाठी निघाले. दास यांना लहानपणापासून वन्यजीव आणि निसर्गाप्रति आवड आहे. देशात वाघांची झपाट्याने कमी होत चाललेल्या संख्येबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. परंतु प्रत्यक्षात कृती करून नागरिकांना जागृत करण्यासाठी दास यांनी भारतभ्रमण करण्याचा निर्णय घेतला. १५ फेब्रुवारीला ते पत्नीसह वाघ वाचवा हा संदेश देण्यासाठी दुचाकीवर निघाले. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, बिहार, उत्तराखंड, हिमालच प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, दीव, मध्य प्रदेश येथून ते नागपुरात आले आहेत. येथून ते बोर, मेळघाट, ताडोबा, नागझिराला भेट देणार आहेत. जंगलाशेजारील गावात जाऊन ते तेथील नागरिकांना वाघ वाचविण्याचा संदेश देत आहेत. शाळा-महाविद्यालयात जाऊनही ते प्रबोधन करीत आहेत. त्यांच्या या कार्यात ठिकठिकाणी वन अधिकारी मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. वाघाचे संरक्षण करण्यासाठी या दाम्पत्याने सुरू केलेले अभियान खरोखरच मोलाचे आहे. वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव ) नितीन काकोडकर यांनी दास यांची भेट घेऊन त्यांना आपण लिहिलेले ‘ताडोबा द अनटोल्ड स्टोरी’ हे पुस्तक भेट दिले.
जगभरात देणार वाघ वाचविण्याचा संदेश
दास दाम्पत्याने जगात फिरून वाघ वाचविण्याचा संदेश देण्याचे ठरविले आहे. मार्च महिन्यापासून ते आपल्या जग भ्रमणाची सुरुवात करणार आहेत. यात म्यानमार, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, लाओस, चीन, रशिया, काठमांडू, भूतान, बांगलादेश येथे वाघ वाचविण्याचा संदेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले.