‘पॉलिटेक्निक’साठी ‘तारीख पे तारीख’
By admin | Published: July 1, 2017 02:25 AM2017-07-01T02:25:08+5:302017-07-01T02:25:08+5:30
मागील वर्षीप्रमाणे पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा निरुत्साहच दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांचा निरुत्साह : प्रवेशाचे अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील वर्षीप्रमाणे पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा निरुत्साहच दिसून येत आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत उपलब्ध जागांच्या केवळ १९ टक्केच अर्ज आल्याने अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज दाखल करण्याची तारीख ४ जुलैपर्यंत वाढवली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्यावर्षीदेखील अशाच पद्धतीने मुदत वाढविण्यात आली होती. परंतु तरीदेखील मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या होत्या.
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या मूळ परिपत्रकानुसार अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० जून ही होती. परंतु विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रमाणात निरुत्साह दिसून आला आहे.
नागपूर विभागात एकूण २४५९५ जागा आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ ४८३८ अर्जच आले आहेत व याची टक्केवारी काढली असता ती अवघी १९.६७ टक्के इतकीच आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. फारच कमी प्रमाणात अर्ज आल्याने जागा कशा भरावा असा यक्षप्रश्न महाविद्यालय प्रशासनांसमोर उभा राहिला आहे.
मोठ्या प्रमाणावर जागा शिल्लक राहण्याचा धोका असल्याने महाविद्यालय प्रशासनावर मोठा दबाव आला आहे. आता चार दिवसांची वाढीव मदत मिळाली असली तरी या कालावधीत फार अर्ज मिळण्याची शक्यता असल्याने थोडासा दिलासा मिळाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र सध्याची एकूण स्थिती पाहता मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहणार असेच अंदाज लावले जात आहेत.
विद्यार्थ्यांसाठीच
वाढवली मुदत
यंदा अपेक्षित प्रमाणात अर्ज आलेले नाही. काही विद्यार्थ्यांना निरनिराळ्या कारणांमुळे अर्ज दाखल करता आलेले नाही. त्यामुळे ही मुदत वाढवली असल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी दिली आहे.