दत्ता मेघे मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2022 09:47 PM2022-11-07T21:47:36+5:302022-11-07T21:48:27+5:30
Nagpur News विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या ९६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी खासदार दत्ता मेघे यांची निवड करण्यात आली आहे.
नागपूर : विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या ९६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी खासदार दत्ता मेघे यांची निवड करण्यात आली असून या संमेलनाच्या संरक्षकपदाची जबाबदारी माजी आ. सागर मेघे यांनी स्वीकारली आहे. हे साहित्य संमेलन दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या भव्य पटांगणावर आयोजित होणार आहे.
नागपूर येथे २००७ साली विदर्भ साहित्य संघातर्फे संपन्न झालेल्या ८० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या संरक्षकपदाची जबाबदारी दत्ता मेघे यांनीच स्वीकारली होती. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची आणि संरक्षकपदाची जबाबदारी पिता-पुत्राने एकाचवेळी सांभाळणे, ही अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासातली एक महत्त्वाची घटना ठरली आहे. या साहित्य संमेलनाच्या मार्गदर्शक पदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वीकारली असून विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांसह वर्धा येथील साहित्यप्रेमी, कार्यकर्ते या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत.
स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, कार्याध्यक्ष डाॅ. रवींद्र शोभणे, सरचिटणीस विलास मानेकर आणि कोषाध्यक्ष विकास लिमये यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
...................