दत्तोपंत ठेंगडी हे आधुनिक भारतातील महापुरुषच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:09 AM2021-01-25T04:09:48+5:302021-01-25T04:09:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एखाद्या व्यक्तीच्या जन्माला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही लोक त्यांच्या कार्य आणि विचारांची चर्चा करीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एखाद्या व्यक्तीच्या जन्माला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही लोक त्यांच्या कार्य आणि विचारांची चर्चा करीत असतील, तर ते व्यक्तिमत्त्व नक्कीच महापुरुष या सदरात मोडणारे आहे, असे समजले जाते. दत्तोपंत ठेंगडी यांच्या कार्यावर आजही मंथन होत असल्याने ते आधुनिक भारतातील महापुरुषच होते, असे मत ज्येष्ठ संपादक रामबहादूर राय यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा लोकप्रशासन विभाग व ताई गोळवलकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन व्याख्यानादरम्यान ते बोलत होते.
प्राचीन सप्तर्षींच्या धर्तीवर आधुनिक भारतातील सप्तर्षींची यादी बनवायची झाल्यास, दत्तोपंत ठेंगडींच्या समावेशाविना पूर्ण होऊ शकत नाही. दत्तोपंत ठेंगडी यांनी आपल्या जीवनात भारतीय मजूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा विविध संस्था उभ्या केल्यात. परंतु, महापुरुषांचे संस्थांच्या परिघात आकलन होऊ शकत नाही. दत्तोपंतांनी आपल्या आयुष्यात वेगळे राजकीय तत्त्वज्ञान मांडले. त्यामुळेच त्यांना युगद्रष्टा म्हंटले जात असे. दत्तोपंतांची जीवनयात्रा दक्षिण भारतातून प्रारंभ झाली होती. गांधींनी नमूद केलेल्या राजकारणाच्या धर्तीवरच दत्तोंपत ठेंगडी यांचा राजकीय प्रवास होता. दत्तोपंत तब्बल दोन वेळ राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त झाले होते. या काळात त्यांना आलेल्या अनुभवाच्या आधारे त्यांनी जनतेचे मार्गदर्शन केले. परंतु, सत्तेच्या राजकारणापासून ते कायम दूर राहिल्याचे राय यांनी सांगितले.
आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण आणि इतर नेत्यांना अटक झाल्यानंतर आंदोलनाची सूत्रे दत्तोपंत ठेंगडी यांच्याकडे आली. त्याकाळी भूमिगत राहून ठेंगडी यांनी जबाबदारीचे हे शिवधनुष्य लिलया पेलले. आणीबाणीनंतर काँग्रेसला पर्याय म्हणून जनता पार्टीचे सरकार स्थापन झाले होते. सरकार स्थापनेनंतर दत्तोपंत सत्तेच्या राजकारणापासून लांब आपल्या कार्यात परतल्याचे राय यांनी सांगितले. या व्याख्यानाचे संचालन व प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. निर्मलकुमार सिंह यांनी केले. यावेळी डॉ. कल्पना पांडे, संयम बनसोड आणि विष्णू चांगदे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.