वीरप्पनचा खात्मा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची कन्या नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2022 10:37 AM2022-08-06T10:37:07+5:302022-08-06T10:41:59+5:30
विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदारी नागपूरच्या नव्या विभागीय आयुक्त
नागपूर : कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याचा खात्मा करणारे प्रसिद्ध आयपीएस अधिकारी शंकर महादेव बिदारी यांची कन्या विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदारी यांची नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहे.
शंकर महादेव बिदारी हे १९७८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
विजयालक्ष्मी या २००१ च्या अखिल भारतीय आयएएस टॉपर आहेत. त्यांचे कुटुंब हे आयएएस-आयपीएस असलेले कुटुंब म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची आई उमादेवी या डॉक्टर असून त्या कुटुंबातील एकमेव नॉन-आयएएस आणि नॉन-आयपीएस व्यक्ती आहेत. त्यांचे भाऊ विजयेंद्र बिदारी, आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्राच्या आयएएस रोहिणी पी. भाजीभाकरे या त्यांच्या वहिनी आहेत.
प्रशासनाचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी सहायक आयुक्त, गुवाहाटी (आसाम) म्हणून काम केले आहे. त्यानंतर सहायक आयुक्त, हिंगोली, सिंधुदुर्गच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव; महाराष्ट्र महिला विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक, कोल्हापूरच्या आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. विजयालक्ष्मी या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर होत्या. त्या इस्रोमध्ये जॉइंट डायरेक्टर पदावर कार्यरत होत्या. त्यांची प्रतिनियुक्ती सहा महिन्यांनी वाढवण्यात आली होती. आता परत त्यांना महाराष्ट्रात पाठवण्यात आले आहे.
प्राजक्ता लवंगारे या केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर डॉ. माधवी खोडे यांच्याकडे विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी आली. त्या सध्या प्रशिक्षणासाठी गेल्या आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. हे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान, शुक्रवारी बिदारी यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले.