आईच्या अवयवदानासाठी मुलीचा पुढाकार
By सुमेध वाघमार | Published: January 14, 2024 05:36 PM2024-01-14T17:36:40+5:302024-01-14T17:36:52+5:30
या वर्षातील पहिले अवयवदान : तिघांना मिळाले नवे आयुष्य.
नागपूर : दोन वर्षांपूर्वी वडील गेले, आता अचानक आईचा ‘ब्रेन डेड’ झाल्याचे कळताच १९ वर्षीय विपाशावर दु:खाचा डोंगरच कोसळला. आई-वडिलांचे छत्र हरविल्याने आपण एकटे पडल्याचा आघात सहन करीत तिने एक निर्णय घेतला, आईला अवयवरुपी जीवंत ठेवण्याचा. तिच्या या मानवतावादी निर्णयाला ‘एम्स’च्या डॉक्टरांनी प्रतिसाद दिला आणि तिघांना नवे आयुष्य मिळाले तर दोघांना दृष्टी मिळाली.
नारा रोड जरीपटका येथील रहिवासी शीतल बडोले (५०) असे त्या अवयवदात्याचे नाव. बडोले या एका खासगी कंपनीमध्ये लेखापाल म्हणून कार्यरत होत्या. एक दिवशी अचानक त्यांची प्रकृती खालवली. त्यांना चक्कर व उलट्या व्हायला लागल्या. नातेवाईकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखविले. परंतु प्रकृती बरी होत नसल्याचे पाहत त्यांना मिहान येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांच्या एका पथकाने तपासनू ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत घोषीत केले. दोन वर्षांपूर्वी वडील आणि आता आईच्या अचानक जाण्याने विपाशा खचली. ‘एम्स’चे समन्वयक प्रीतम त्रिवेदी व प्राची खैरे यांनी विपाशाला अवयवदानाविषयी माहिती दिली. विपाशा या विषयी ऐकूण होती. तिने आईला अवयवरुपी जीवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. तिच्या या संमतीने विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने (झेडटीसीसी) पुढील अवयवदानाची प्रक्रिया सुरू केली.
-तीन तरुण पुरुषांना मिळाले जीवनदान
बडोले यांच्या अवयवदानाने अवयवाच्या प्रतिक्षेत मृत्यूच्या दाढेत जगत असलेल्या तीन तरुण पुरुषांना जीवनदान मिळाले. एक मूत्रपिंड ‘एम्स’मधील ३३ वर्षीय पुरुष रुग्णाला, दुसरे मूत्रपिंड केअर हॉस्पिटलमधील ३२ वर्षीय रुग्णाला तर यकृत ३५ वर्षीय रुग्णाला दान करण्यात आले. कॉर्निआ ‘एम्स’च्या नेत्ररोग विभागाला दान करण्यात आले.
-‘एम्स’मध्ये वाढतोय अवयवदानाचा टक्का
मेयो, मेडिकलसारख्या जुन्या रुग्णांलयांना मागे टाकत ‘एम्स’ने मागील वर्षी त्यांच्याकडे ‘ब्रेन डेड’ झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करीत ११ व्यक्तींचे अवयवदान केले. तर या वर्षीची सुरूवातही ‘एम्स’ने अवयवदान करून केली. एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात डॉ. भरतसिंग राठोड, डॉ. ओमशुभम असई, डॉ. वीरध कटियार व इंटेन्सिव्हिस्ट डॉ. सुचेता मेश्राम यांचा पुढाकारामुळे हे १२वे अयवदान होऊ शकले.