मनोरुग्णांसाठी आता ‘डे-केअर सेंटर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:08 AM2021-02-12T04:08:04+5:302021-02-12T04:08:04+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : एखाद्या व्यक्तीचे मानसिक संतुलन ढासळल्यास त्याला मनोरुग्णालयात दाखल केले जाते. परंतु काही रुग्णांना मनोरुग्णालयात दाखल ...
सुमेध वाघमारे
नागपूर : एखाद्या व्यक्तीचे मानसिक संतुलन ढासळल्यास त्याला मनोरुग्णालयात दाखल केले जाते. परंतु काही रुग्णांना मनोरुग्णालयात दाखल करण्याइतका त्यांचा आजार बळावलेला नसतो. अशा रुग्णांची दिवसभर घरी राहून काळजी घेणेही अशक्य असते. अनेकदा त्यांना त्यांच्या वर्तवणुकीमुळे घरातील लोकांची चिडचिड, राग आणि मारहाणही सहन करावी लागते. यातूनच आपण मनोरुग्ण असल्याची भावनाही रुजते. आजार वाढण्याची भीती असते. अशा रुग्णांवर उपचारासोबतच, त्यांचे पुनर्वसन करण्याच्या प्रयत्नासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयाने ‘डे-केअर सेंटर’ सुरू करण्याचे पाऊल उचलले आहे. टाटा ट्रस्टच्या मदतीने चालणारे हे राज्यातील पहिले केंद्र असणार आहे.
व्यसनाधीनता, परीक्षेतील अपयश, कौटुंबिक कलह, व्यवसायातील अडचणी, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा, प्रेमभंग, तीव्र नैराश्य अशा अनेक कारणांमुळ मानसिक आजाराची शक्यता वाढली आहे. रोजच्या आयुष्यातील ताणतणावांमुळे मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. २०३० पर्यंत भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के लोकांना हा आजार होण्याचा धोका वर्तविला जात आहे. राज्यात सुमारे ८० लाखांच्यावर मनोरुग्णांना उपचाराची गरज आहे. गेल्या काही वर्षांत औषधोपचारांच्या क्षेत्रात आमूलाग्र प्रगती झाली असतानाही वेगाने वाढणारे मनोरुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढलेले नसल्याचे वास्तव आहे. याची दखल घेऊन टाटा ट्रस्ट केअर हॉस्पिटलने जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत प्रादेशिक मनोरुग्णालयात डे-केअर सेंटर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केले आहे. हे सेंटर मनोरुग्णांच्या वॉर्डापासून दूर असणार आहे.
-असे असणार केंद्र
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांसाठी, मनोरुग्णालयातून बरे होऊन सुटी झालेल्या व इतरही मनोरुग्णांसाठी हे डे-केअर सेंटर असणार आहे. या सेंटरची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. मानसोपचार तज्ज्ञ, आक्युपैशनल थेरेपिस्ट, ट्रेनर आणि ‘सपोर्टिंग स्टाफ’ असा चमू कार्यरत असेल. सकाळी या केंद्रात रुग्णाला आणल्यानंतर त्यांच्यावर उपचारासोबत त्यांना खाऊ-पिऊ घालणे, त्यांच्याशी खेळणे, त्यांना आवड असलेल्या गोष्टीचे प्रशिक्षण देऊन त्याचे पुनर्वसन करण्याचा या सेंटरमधून प्रयत्न होणार आहे.
- ‘सायको एज्युकेशन’ही दिले जाणार
प्रादेशिक मनोरुग्णालयातील डॉक्टरांनुसार, ‘डे-केअर सेंटर’मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना ‘सायको एज्युकेशन’ही दिले जाणार आहे. यात ‘स्किझोफ्रेनीया’, नैराश्य व सतत आत्महत्येचे विचार येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांचे गट पाडले जाईल. आजाराची लक्षणे, उपचार व त्यांच्या देखभालीवर नातेवाईकांचे समुपदेशनही केले जाईल.
- येत्या ६ महिन्यांत ‘डे-केअर सेंटर’ रुग्णसेवेत
टाटा ट्रस्टच्या मदतीने प्रादेशिक मनोरुग्णालयात येत्या ६ महिन्यांच्या आत ‘डे-केअर सेंटर’ रुग्णसेवेत रुजू होईल. पायाभूत सोयींचे काम पूर्ण झाले असून, फायर ऑडिटचे काम शिल्लक आहे. साधारण एकाचवेळी ५० रुग्ण थांबू शकतील, असे हे सेंटर असणार आहे.
- डॉ. श्रीकांत करोडे
उपवैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय