सत्याचा जीवनसंकल्प घेण्याचा दिन म्हणजेच ‘ईद’
By admin | Published: July 19, 2015 03:06 AM2015-07-19T03:06:55+5:302015-07-19T03:06:55+5:30
ईद-उल-फितर म्हणजे आयुष्यभर सत्य आणि चांगल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे.
मौलाना मुस्तफा यांचे उद्गार : शहरात सर्वत्र आनंदात साजरी झाली ईद-उल-फितर
नागपूर : ईद-उल-फितर म्हणजे आयुष्यभर सत्य आणि चांगल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. हा दिवस अल्लाहला आनंद देण्यासाठी जगायला पाहिजे. पवित्र रमजान महिन्यात दिवस-रात्र अल्लाहची प्रार्थना करताना आपल्या हातून कुठलेही वाईट कार्य घडू नये म्हणून आपण प्रयत्न करीत असतो. कारण अल्ला सर्वव्यापी आहे त्यामुळेच त्याची आदरयुक्त भीती आपल्याला वाटते. ही भीतीच माणसाला सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते, असे मत इस्लामी विचारवंत व मजलिस-ए-तालीमुल कुराणचे मौलाना मोहम्मद मुस्तफा यांनी व्यक्त केले.
मोमिनपुरा मुस्लिम फुटबॉल ग्राऊंड येथे ईदच्या नमाजापूर्वी ते उपस्थितांना संबोधित करीत होते. शनिवारी संपूर्ण शहरात ईद आनंदात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शहरातील मस्जिद, ईदगाह येथे नमाज-ए-ईद-उल-फितर अदा करण्यात आली. मौलाना म्हणाले, रमजान महिना अतिशय पवित्र आहे. या महिन्यात केलेले सत्कर्म माणसाचे केवळ मनच नव्हे तर चारित्र्यही शुद्ध करते. पैगंबर मोहम्मद यांनी आपले संपूर्ण जीवन सत्य, सदाचार आणि सकारात्मक जीवनाचे शिक्षण देण्यासाठी घालविले. वाईट कार्याचा शिकार माणूस होऊ नये म्हणून इस्लामने प्रत्येक वळणावर माणसाला सत्यमार्गाने जाण्याचा उपदेश दिला.
याप्रसंगी मौलानांनी रमजान आणि ईद-उल-फितर यांचे महत्त्व विस्ताराने सांगितले. सकाळी ७ वाजतापासूनच ईदची नमाज पढण्यास प्रारंभ झाला. बोरियापुरा ईदगाह, सदर ईदगाह, जाफर नगर ईदगाह, फुटबाल ग्राउंड, ताजनगर ग्राउंडसहित शहरातील सर्व मशिदीत ईदची नमाज अदा करण्यात आली. उपराजधानीत सर्वप्रथम ईदची नमाज अन्सारनगर येथील नूरानी मशीद येथे सकाळी ७ वाजता पढण्यात आली. कारी इर्शाद यांनी ही नमाज-ए-ईद-उल-फितर अदा केली. याप्रमाणेच फुटबाल ग्राउंड येथे हाफीज अबुल हसन, मशीद गरीबनवाज येथे मौलाना नईम रिजवी, मौलाना मोहसीन रजा यांनी नमाज अदा केली.
छावणीच्या मशिदीत हाफिज मोहम्मद खालिद यांनी नमाज पढविली. नमाज अदा केल्यानंतर ईदची शुभेच्छा देण्यात मुस्लिम बांधव व्यस्त होते. मोमिनपुरा चौकात शहरातील तमाम राजकीय पुढाऱ्यांनी पोहोचून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात. मोमिनपुरा इस्लामिया कॉलेज चौकात कें द्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मिलिंद माने, भाजप अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष हाजी अश्फाक पटेल यांनीही शुभेच्छा दिल्यात. माजी खा. विलास मुत्तेमवार, माजी मंत्री अनिस अहमद, शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी शेळके, मोहम्मद समीर यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. उत्तर नागपुरात माजी मंत्री नितीन राऊत यांनी आसीनगर चौकात ईदच्या शुभेच्छा दिल्या. मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लेमीन चे शहर अध्यक्ष हाजी सलीम, जुल्फेकार अहमद शानू यांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)