‘डे टू डे’ चालणार खटला

By admin | Published: January 7, 2015 01:01 AM2015-01-07T01:01:23+5:302015-01-07T01:01:23+5:30

संपूर्ण शहराला हादरवणाऱ्या लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय निष्पाप बालक युग चांडक याच्या अपहरण-हत्याकांड खटल्याची सुनावणी ८ जानेवारीपासून प्रधान जिल्हा

'Day Two Day' suit | ‘डे टू डे’ चालणार खटला

‘डे टू डे’ चालणार खटला

Next

पहिल्या दिवशी १० साक्षीदार : उद्यापासून सुनावणी
नागपूर : संपूर्ण शहराला हादरवणाऱ्या लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय निष्पाप बालक युग चांडक याच्या अपहरण-हत्याकांड खटल्याची सुनावणी ८ जानेवारीपासून प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात प्रारंभ होत आहे.
८ ते १८ जानेवारीपर्यंत हा खटला ‘डे टू डे’ सुरू राहणार आहे. सरकार पक्षाने न्यायालयाला एकूण ७५ साक्षीदारांची यादी सोपवली असून पहिल्या दिवशी १० साक्षीदारांची साक्ष तपासली जाणार आहे.
राजेश धनालाल दवारे (१९) रा. वांजरी ले-आऊट कळमना त्याचा मित्र अरविंद अभिलाष सिंग (२३) रा. प्रीती ले-आऊट, नारा रोड जरीपटका, या दोन आरोपींविरुद्ध हा खटला चालणार आहे. तिसरा आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक असून त्याच्याविरुद्ध बाल न्यायालयात खटला चालणार आहे.
केवळ थरकापच
१ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चिमुकला युग शाळेच्या बसमधून उतरताच ‘मम्मी हॉस्पिटल में बुला रही है’, अशी थाप मारून त्याचे स्कूटीने अपहरण करण्यात आले होते. युग हा सेंटर पॉर्इंट शाळेचा दुसऱ्या इयत्तेचा विद्यार्थी होता. त्याचे वडील डॉ. मुकेश चांडक दंत चिकित्सक असून त्यांचे दोसरभवन चौकात क्लिनिक आहे. अपहरणाच्या दिवशीच दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात युगचा निर्घृण खून करण्यात आला होता. मुख्य आरोपी राजेश याने २ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता कबुली देऊन मृतदेह काढून दिला होता. मृतदेह रेतीने झाकलेला होता आणि डोक्यावर मोठा दगड ठेवलेला होता. युगचा मृत्यू गुदमरून झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्याचा अभिप्राय शवविच्छेदन अहवालात आहे. त्याच्या संपूर्ण शरीरावर २६ जखमा होत्या. आरोपींकडून दोनवेळा खंडणीसाठी फोन करण्यात आले होते. पहिला फोन १ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ८.१७ वाजता डॉ. मुकेश चांडक यांना करण्यात आला होता. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव मोहसीन खान असल्याचे सांगितले होते. त्याने १० कोटी रुपयाची मागणी केली होती. लागलीच रात्री ८.३८ वाजता दुसरा फोन आला होता. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव सांगितले नव्हते. ‘युग हमारे कब्जे मे है, ५ करोड लेकर आओ, कल शाम ३ बजे बम्बई मे पैसे लेकर आना’, असेही त्याने म्हटले होते. या प्रकरणाचा तपास लकडगंज ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी केलेला आहे. त्यांनीच आरोपींविरुद्ध २९० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्यावतीने हा खटला अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी आणि सरकार पक्षाला साहाय्य म्हणून फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा लढत आहेत. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड.मनमोहन उपाध्याय आणि अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 'Day Two Day' suit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.