नागपुरात कुख्यात गुंडांची दिवसाढवळ्या हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 08:33 PM2018-11-30T20:33:16+5:302018-11-30T22:04:58+5:30

पाचपावलीतील कुख्यात गुंड पिंटू दिनू ठवकर (वय ३५) याची त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास निर्घृण हत्या केली. या हत्याकांडामुळे राऊत चौक, पाचपावली परिसरात आज दुपारी प्रचंड थरार निर्माण झाला होता.

Daylight murder of notorious goons in Nagpur | नागपुरात कुख्यात गुंडांची दिवसाढवळ्या हत्या

नागपुरात कुख्यात गुंडांची दिवसाढवळ्या हत्या

Next
ठळक मुद्दे उत्तर नागपुरातील पाचपावली भागात थरार : गुन्हेगार फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावलीतील कुख्यात गुंड पिंटू दिनू ठवकर (वय ३५) याची त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास निर्घृण हत्या केली. या हत्याकांडामुळे राऊत चौक, पाचपावली परिसरात आज दुपारी प्रचंड थरार निर्माण झाला होता.
पिंटू ठवकर हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, दंगा भडकावणे, अपहरण, खंडणी वसुली, पोलिसांवर हल्ले करणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्यावर पोलिसांनी दोन वेळा तडीपारीची, स्थानबद्धतेची कारवाई केली होती. मात्र, त्याच्या गुन्हेगारीला चाप बसविण्यात पोलीस अपयशी ठरले होते. तो पाचपावलीतील छोटे मोठे दुकानदार तसेच नागरिकांनाही खंडणीसाठी छळायचा. त्यामुळे त्याची तिकडे प्रचंड दहशत होती. सहा महिन्यांपूर्वी पिंटू कारागृहातून बाहेर आला. तेव्हापासून त्याने पाचपावलीत जुगार अड्डा तसेच क्लब सुरू केला होता. हत्या करणाऱ्यांपैकी एक गुंड त्याच्या जुगार अड्डयावर ‘करू’ (जुगारात मनासारखे पत्ते टाकून पैसे जिंकून देणारा) म्हणून काम करायचा. त्याने प्रतिस्पर्धी गुंडांसोबत हातमिळवणी केल्याचे समजल्याने पिंटूचे करू तसेच दुसºया गुंडांसोबत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांच्यात हाणामारी झाली होती आणि त्यांनी एकमेकांना पाहून घेण्याचीही धमकीही दिली होती. पिंटूची खुनशी वृत्ती ध्यानात घेता तो कधीही घात करू शकतो, अशी भीती असल्यामुळे त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी पिंटूचा गेम करण्याचा कट रचला होता. गेल्या काही दिवसांपासून ते संधीचा शोध घेत होते. या पार्श्वभूमीवर, आरोपींनी सकाळपासूनच पिंटूवर डोळा ठेवला होता. दुपारी २.३० ते २.४५ च्या सुमारास पिंटू कोर्टातून तारीख घेऊन आपल्या अड्याकडे जाण्यासाठी निघाला. नाईक तलाव, राऊत चौकाजवळ येताच सीताराम शाहू, गोलू चांदरी, मनीष सबानी आणि सागर भांजा तसेच त्यांच्या साथीदारांनी पिंटूला घेरले. त्याच्यावर चाकू, तलवार, गुप्ती आणि कुकरीसारख्या घातक शस्त्रांचे अनेक घाव घालत आरोपींनी त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. भरदिवसा वर्दळीच्या भागात पिंटूवर घातक शस्त्रांचे घाव घालत असताना अनेक जण सिनेमासारखे नुसते बघत होते. पिंटू मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी पळून गेले. त्यानंतर कुण्या एकाने ही माहिती पोलिसांना कळवली.
दिवसाढवळ्या कुख्यात गुंडाचा दुसºया गुंडांनी वर्दळीच्या ठिकाणी गेम केल्याचे वृत्त कळताच पोलिसांमध्ये खळबळ उडाली. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद मुंडे यांच्यासह पाचपावली तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. मृत पिंटूचे शव मेडिकलला पाठविण्यात आले. पोलिसांनी आरोपींची नावे माहीत करून त्यांची शोधाशोध सुरू केली. मात्र, वृत्त लिहिस्तोवर एकही गुन्हेगार हाती लागला नव्हता.
नंबरकारी बचावला
कुख्यात पिंटू नेहमी साथीदारांच्या गराड्यात राहायचा. आज दुपारीही तो कोर्टात साथीदारांसहच गेला होता. वस्तीत परतताना मात्र त्याच्यासोबत एकच गौरव नामक नंबरकारी (सोबतचा गुन्हेगार) होता. आरोपींजवळची घातक शस्त्रे बघून आणि ज्या पद्धतीने ते पिंटूवर तुटून पडले, ते बघता गौरव जीव मुठीत घेऊन पळाला. त्यामुळे तो बचावला. कुख्यात पिंटू वाचला तर आपल्याला जिवंत सोडणार नाही, अशी भीती असल्यामुळे आरोपींनी त्याच्यावर मरेपर्यंत शस्त्रांचे वार केले. तो निपचित पडल्यानंतरही काही गुंड त्याच्यावर शस्त्राचे घाव घालतच होते. 

चौघांना अटक, अन्य आरोपींची शोधाशोध 
पाचपावली पोलिसांनी मृत पिंट्याचा साथीदार गौरव सूर्यकांत ढवळे (वय ३०, रा. शांतीनगर) याच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला. तसेच  धावपळ करून उशिरा रात्री या हत्याकांडाचा सूत्रधार सीताराम मुलचंद शाहू (वय ३०, रा. नाईक तलाव), सागर उर्फ भांजा मंगल तेलंगे (वय १८, रा. मस्कासाथ, संभाजी कासार परिसर), मंगल अरुण मांढरे (वय २०, रा. ढिवर मोहल्ला) याच्यासह अशा चौघांना अटक केली. या हत्याकांडात चांदरी आणि मनीषसह आणखी काही आरोपींची नावे पुढे आली आहे. दरम्यान, आरोपींनी प्राथमिक चौकशीत हत्याकांडाची कबुली दिली. पिंटू उर्फ भु-या आपला गेम करण्याच्या तयारीत होता, म्हणून जीवाच्या भीतीने त्याचा गेम केल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिल्याचे समजते. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होऊ शकते, अशी माहिती पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Daylight murder of notorious goons in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.